लोकमत न्यूज नेटवर्कसुलतानपूर:‘वन नेशन वन रेशन’च्या नावाखाली लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथील एका युवकाची दिल्लीत दहा लाखांनी फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी झारखंडमधील दोघांना अटक केली आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांचे एक पथक हे राची आणि महाराष्ट्रात या प्रकरणाच्या तपासासाठी दाखल झाले आहे.‘वन नेशन वन राशन’च्या बनावट जाहीरात बघून सुलतानपूर येथील एनजीओ चालवणारे भागवत साहेबराव वायाळ हे दिल्ली येथे गेले होते. तेथे राची येथील दोघांनी त्यांना ‘वन नेशन वन रेशन’ योजनेतंर्गत राशन कार्ड छापण्याचे सब कॉन्ट्रॅक्ट देतो, असे भासवून भागवत साहेबराव वायाळ यांची फसवणूक केली. या प्रकारासंदर्भात त्यांनी पोलिसांशी संपर्क केला असता त्यांना कुठलेही सहकार्य मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी केंद्रीय अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे यासंदर्भात माहिती दिली. त्याआधारावर रावसाहेब दानवे यांनी दिल्ली पोलिसांना सुचना करत तपासाची चक्रे फिरवली. दिल्ली पोलिसांनी कॅनॉट प्लेसमधून प्रत्युश कुमार राणा आणि विकास कुमार या दोघांना अटक केली तर तिघे फरार आहेत, अशी माहिती या प्रकरणात फसवणूक झालेले भागवत वायाळा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
आरोपींकडे बनावट कागदपत्रेअटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींकडे मंत्रालयातील बनावट कागदपत्रांसह भागवत वायाळ यांचे आधार, पॅनकार्ड आढळून आले आहे. दरम्यान, या दोघांच्या अटकेमुळे या टोळीच्या मुळ सुत्रधारांपर्यंत पोलिसांना आता पोहोचणे शक्य होणार आहे.