लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : मागील दोन आठवड्यांपासून उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्रवारी १२ मार्च रोजी शहरात ३७.१ इतके तापमान नोंदविले गेले. या वेळी मार्च महिन्यातच तापमानाने उसळी घेतली असल्याचे चित्र आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासूनच यंदा उष्णतामान जाणवायला लागले आहे. मार्च हीटने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. सकाळी ९ वाजतापासून सायंकाळी ६ वाजतापर्यंत उन्हाचे चटके जाणवत आहेत. त्यामुळे दुपारच्या सुमारास रस्ते आणि बाजारपेठ निर्मनुष्य होताना दिसत आहे. पत्र्याची घरे भट्टीसारखी तापत असल्याने नागरिक वृक्षांच्या सावलीचा आधार घेताना दिसत आहेत. रखरखत्या उन्हामुळे शीतपेये आणि रसदार फळांची मागील काही दिवसांपासून वाढल्याचे दिसून येत आहे. उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. वाढत्या उन्हामुळे बालकांसह वयोवृद्धांच्या शरीरातील पाणी कमी होत आहे. अधिक घाम आल्याने शरीरातील सोडियम व पोटॅशियमचे प्रमाण कमी होते. परिणामी भोवळ येणे, अस्वस्थता जाणवणे, हातापायाला गोळे येणे, लहान मुलांच्या नाकातून रक्तस्राव होणे अशा प्रकारच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.
खामगावात उन्हाचा कडाका; पारा ३७ अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 11:37 AM