बुलडाणा : बीजोत्पादनात बुलडाणा जिल्हा राज्यात आघाडीवर आहे; परंतु खरीप हंगामात गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे ९४ हजार १३३ हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानामुळे यंदा बियाणे तुटवड्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात उन्हाळी सोयाबीन पेरणीचा प्रयोग राबविण्यात येत आहे. बियाणेटंचाईवर ही पेरणी महत्त्वाची मात्रा ठरेल, असा अंदाज आहे.
राज्यात वाशिम, हिंगोली, परभणी आणि बुलडाणा, या चार जिल्ह्यांत प्रामुख्याने बीजोत्पादन सर्वाधिक होते. बीजोत्पादनातून जिल्ह्यातील सहा हजार शेतकऱ्यांना वर्षाकाठी तब्बल ५२ कोटी रुपयांचा मोबदला मिळत आहे. खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात १ लाख ७४ हजार क्विंटल बीजोत्पादनाचे उद्दिष्ट होते; परंतु अतिपावसामुळे या बीजोत्पादनावरही परिणाम झाला. जिल्ह्यात सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील ९४ हजार १३३.३७ हेक्टर क्षेत्रावरील पीक पाण्यात गेले. गतवर्षी निकृष्ट बियाण्यांचाही मुद्दा ऐरणीवर आला होता. येत्या खरीप हंगामातील बियाणेटंचाईची शक्यता पाहता, कृषी विभागाकडून उन्हाळी पेरणीकडे लक्ष केंद्रित करण्यात आले. कृषी विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात यंदा उन्हाळी सोयाबीन बियाणेटंचाईवर महत्त्वाचा पर्याय ठरणार आहे. उन्हाळ्यात झडती लागत नाही. त्यामुळे शक्यतो पेरणी केली जात नाही; परंतु यंदा बियाणेटंचाई पाहता, अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनला पसंती दिली आहे.
माहिती गोळा करणे सुरू
जिल्ह्यात फेब्रुवारीपासून उन्हाळी पेरणीला सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनचा पेरा घेतला याची माहिती गोळा करण्याचे काम सध्या कृषी विभागाकडून सुरू आहे. यामध्ये मेहकर तालुक्यात सर्वाधिक उन्हाळी सोयाबीन घेण्यात आले आहे.
खरिपातील बीजोत्पादनालाही फटका
जिल्ह्यात १२ हजार ९८९ हेक्टर क्षेत्रावर बीजोत्पादनाचा हा कार्यक्रम राबविण्यात आला होता. यामध्ये सोयाबीन ७१ हजार ४१६ क्विंटल, उडीद ८३२ क्विंटल, मूग ४२ क्विंटलचा समावेश होता. तूर १ हजार २८४ क्विंटलचा समावेश होता; परंतु अतिवृष्टीचा खरीप हंगामातील बीजोत्पादनालाही फटका बसला आहे.
कोट....
गतवर्षी झालेल्या अतिपावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा खरिपात बियाणे तुटवड्याची शक्यता पाहता, शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनची घेतलेली आहे. सध्या हे सोयाबीन चांगल्या स्थितीत आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचा बियाण्याचा प्रश्न मिटणार आहे. यामुळे नवीन वाण शेतकऱ्यांना मिळेल.
-सी.पी. जायभाये, कृषी शास्त्रज्ञ, बुलडाणा
१,४३,७२४
नुकसानग्रस्त शेतकरी
पीकनिहाय नुकसान हेक्टरमध्ये
सोयाबीन ४१,२८७.३
मका ३२७.५४
कापूस २४,५२४.७८
तूर ४,५४१.३९
उडीद ३,४८८.५१
मूग १८,९३०.८२