खामगाव: तालुक्यातील टेंभूर्णा येथील बेस गोदामातून जिल्ह्यातील सर्वच शासकीय गोदामात माणसांच्या नव्हे तर चक्क जनावरांच्या खाण्यालायक नसलेल्या गव्हाचा पुरवठा होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच १६ गोदामात कमी अधिक फरकाने हा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे पुरवठा विभागाची डोकेदुखी वाढत असल्याचे दिसून येते.
आनंदाचा शीधा वाटप रखडलेला असतानाच, रेशनकार्ड लाभार्थ्यांना वितरीत करण्यासाठी निकृष्ट दर्जाचा गहू खामगाव येथील बेस गोदामातून पाठविण्यात येत अाहे. याबाबत तक्रारी वाढीस लागल्यानंतर पुरवठा विभागाकडून सारवासारव केली जात आहे. त्याचवेळी टेंभूर्णा येथील बेस गोदामात किटकनाशक फवारणी केली गेली. टेंभूर्णा येथील गोदामातून सरकारी धान्य गोदामात माल पाठविताना नमूना न घेतल्या जात असल्याने, निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पुरवठा होत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, गत दीड महिन्यांपासून बंद असलेल्या गोदामातून मालाची प्रत न तपासताच धान्य पुरवठा होत आहे. त्यामुळे गोदामपालक आणि स्वस्त धान्य दुकानदारांसोबतच लाभार्थीही वेठीस धरल्या जात असल्याचे दिसून येते.
बुलढाणा जिल्ह्यात सोळा गोदामात पुरवठा
बुलडाणा जिल्ह्यात एकुण १६ शासकीय गोदाम आहेत. यामध्ये चिखली, सिंदखेड राजा आणि मेहकर तालुक्यात प्रत्येकी दोन तर उर्वरित तालुक्यात प्रत्येकी एक गोदाम आहे. जिल्हयातील मोताळा तालुक्यासह सर्वच ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या गव्हाचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत.
वाढत्या तक्रारींमुळे फवारणी
शासकीय गोदामात निकृष्ट दर्जाचा गहू वितरीत होत असल्याच्या तक्रारी गत काही दिवसांत वाढीस लागल्या. त्यामुळे गत दोन दिवसांपासून बेस गोदामात द्रावणाची फवारणी केली जात असून, काही ठिकाणी ओला गहू पाठविण्यात आला. तर काही ठिकाणी चक्क गव्हाची ढेप पाठविण्यात आल्याचे समोर येत आहे.
संग्रामपूर येथून तीस कट्टे परत
गव्हाचा दर्जा खराब आल्याने संग्रामपूर तालुक्यातून ३० कट्टे परत बेस गोदामात पाठविण्यात आले होते. त्याचप्रमाणे तांदळात चुरीचे प्रमाण जास्त असल्याने तांदळाचे वितरही थांबविण्यात आले होते. त्यानंतर आता बेस गोदामातून पुन्हा निकृष्ट गव्हाचा पुरवठा होत असल्याचे समोर येत आहे.
गोदामातून निकृष्ट दर्जाच्या गव्हाच्या पुरवठ्या बाबत माहिती घेतली जाईल. तक्रारींचे निरसन करण्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन, योग्य ती कारवाई केली जाईल.
नितिन इंगळेअवल कारकून, (अन्न, पुरवठा)