लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कर्जमुक्तीसह शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत मागण्यांसाठी १ जूनपासून शेतकऱ्यांच्यावतीने स्वयंस्फूर्तीने राज्यभर संप पुकारण्यात आला आहे. या संपाला पाठिंबा देत शिवसेनाप्रणित किसान सेनेच्यावतीने सकाळी ८ वाजता बुलडाण्यातील स्टेट बँक चौकात रस्त्यावर दूध ओतून समर्थन देण्यात आले. १ जूनपासून कर्जमुक्तीसह विविध मागण्यांकरिता शेतकरी व विविध शेतकरी संघटनांच्यावतीने शेतकऱ्यांचा संप सुरू करण्यात आला आहे. बुलडाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या संपाला चिखली, देऊळगाव राजा येथेही पाठिंबा मिळाला. शिवसेनेचे नेते खासदार तथा संपर्क प्रमुख प्रतापराव जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत, शिवसेना नेते संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनामध्ये किसान सेना उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन रस्त्यावर दूध ओतून शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमुक्ती द्या, स्वामिनाथन आयोग लागू करा, शेती मालाला हमीभाव द्या, दुधाला योग्य दर मिळालाच पाहिजे, भाजीपाल्याला योग्य दर मिळाला पाहिजे, सोयाबीनच्या हमीभावात वाढ करा, शेतकरी एकजुटीचा विजय असो, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी बुलडाणा शहर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन काही वेळांनी किरण पाटील, विजय सोनुने, नीलेश बारोटे, सतीश जगताप, गजानन उबरहंडे, अनिल उबरहंडे, रवि उबरहंडे, नंदु उबरहंडे, नीलेश काकडे, दीपक काकडे, जगन्नाथ उबरहंडे, गजानन जाधव, दिनकर उबरहंडे, प्रदीप उबरहंडे यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
दूध ओतून संपाला पाठिंबा!
By admin | Published: June 02, 2017 12:59 AM