लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : अल्पावधीत राष्ट्रीय स्तरावर बुलडाणा अर्बन संस्थेची पताका फडकाविणारे संस्थेचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर तथा इंटरनॅशनल को-आॅप. अलायन्स युथ कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर यांच्या कार्याची दखल मॉरिशसमधील प्रसार माध्यमांनी घेतली असून, स्थानिक राष्ट्रीय वाहिन्यांवर डॉ. झंवर यांच्या मुलाखतीसोबतच बुलडाणा अर्बनची यशोगाथा प्रसारित करण्यात आली. यावेळी बुलडाणा अर्बनप्रमाणेच मॉरिशसमधील पतसंस्था (क्रेडिट युनियन) बळकट करण्याकरिता स्थानिक सरकारने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.इंटरनॅशनल को-आॅप. अलायन्स युथ कमिटीचे अध्यक्ष या नात्याने डॉ. सुकेश झंवर यांनी मॉरिशसला भेट दिली. आपल्या सहा दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी मॉरिशसच्या सहकार मंत्र्यांची व सहकार सचिवांची भेट घेतली. यावेळी डॉ. झंवर मॉरिशसची शिखर संस्था असलेल्या मॉरिशस को-आॅप. अलायन्स अध्यक्षांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत जवळपास ४० ते ५० को-आॅप. क्रेडिट युनियनचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. झंवर यांनी सहकार क्षेत्र व बुलडाणा अर्बन संस्थेच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक कार्याची माहिती दिली. सहकार क्षेत्रात युवकांचा सहभाग कसा वाढविता येईल, यासाठी कोणत्या कार्यक्रमांची आखणी व नियोजन करणे शक्य आहे या संदर्भात मॉरिशसच्या सहकार मंत्र्यांनी डॉ. झंवर यांच्यासमवेत सविस्तर चर्चा केली, तर इंटरनॅशनल को-आॅप. अलायन्सच्या माध्यमातून सहकार व अन्य क्षेत्रात काही चांगल्या सुधारणांचे कार्यक्रम आपल्या देशात सुरु करण्याची आवश्यकता मॉरिशस सरकारच्यावतीने डॉ. सुकेश झंवर यांचे समवेत झालेल्या चर्चेत व्यक्त करण्यात आली.आपल्या मॉरिशस दौऱ्यात डॉ.सुकेश झंवर यांनी मॉरिशस येथील क्रेडिट को-आॅप.युनियन शुगर को-आॅप. व अॅग्रीकल्चर को-आॅप. संस्थांना भेटी दिल्या. दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात मॉरिशसच्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी डॉ.झंवर यांची भेट घेऊन सहकार, कृषी व विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी बोलताना डॉ.झंवर म्हणाले, की सहकार क्षेत्रात स्थानिक तरुणांचा जास्तीत जास्त सहभाग वाढला पाहिजे. कारण सहकारच्या माध्यमातून व्यवसाय वाढीबरोबरच रोजगाराची मोठी संधी असल्याचे नमूद केले. यासाठी दोन्ही देशातील सरकारांनी सामंजस्य व समन्वयाने पुढाकार घेऊन प्रयत्न करण्याची आवश्यकता व्यक्त केली. पुढे बोलताना डॉ. झंवर म्हणाले, की भारत व मॉरिशस सहकार क्षेत्राने एकमेकांपासून पुष्कळ काही शिकण्यासारखे असल्याचे स्पष्ट केले.सहकार क्षेत्र बळकट करण्यासाठी आणखी काय करण्याची आवश्यकता आहे, असा प्रश्न एका प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींने विचारला असता, त्यावर तुम्ही सभासदांचे काळजी घ्या, त्यांच्या अडचणी जाणून घ्या, पुढे हेच सभासद तुमची काळजी घेतील आणि हाच सहकारातील यशाचा मंत्र असल्याचे उत्तर डॉ. झंवर यांनी दिली. दरम्यान डॉ.झंवर यांच्या मॉरिशस दौऱ्याचा संपूर्ण वृत्तांत युटूबवर उपलब्ध आहे.
मॉरिशसच्या मीडियाकडून सुकेश झंवर यांच्या कार्याची दखल
By admin | Published: May 30, 2017 12:18 AM