मलकापूर: अकोल्यात ज्याच्याकडे शस्त्रक्रिया केली तो डॉक्टर व त्याचा सहायकाचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे मलकापूर तालुक्यातील कुंड व शिवणी येथील तिन जणांना गेल्या दोन दिवसात आरोग्य विभागाने क्वारंटीन करून पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे हलविले आहे. यामुळे मलकापूरात एकच खळबळ उडाली आहे. मलकापूर तालुक्यातील कुंड बु.येथील ४६ वर्षीय इसम अकोल्यात एका डॉक्टरकडे उपचारासाठी भरती होता. त्याच्या सोबत ४२ वर्षीय पत्नी व मौजे शिवनी येथील ४१ वर्षीय मावसभाऊ थांबले होते. दोन दिवसांपूर्वी त्या रुग्णाची शस्त्रक्रिया करण्यात आली. घरी आल्यानंतर याची कुठलीही माहिती त्यांनी प्रशासनास दिली नाही. तिकडे अकोल्यात या रुग्णाची शस्त्रकिया करणारा डॉक्टर व कंपाउंडर कोरोना बाधित आढळून आले. या प्रकाराची माहिती अकोल्यावरुन मलकापूर आरोग्य विभागाला देण्यात आली.
त्यानंतर नरवेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद माळी वैद्यकीय पथकासह मौजे कुंड बु. येथे दाखल झाले. त्यांनी संबंधीत रुग्णाची कसून चौकशी केली. त्या रुग्णासह त्याची पत्नी अशा दोघांना गुरुवारी संध्याकाळी क्वारंटीन करून पुढील उपचारार्थ बुलडाणा येथे हलविण्यात आले. चौकशी दरम्यान त्या रुग्णासोबत त्याचा मौजे शिवणी येथील ४१ वर्षीय मावसभाऊ देखील होता हे स्पष्ट झाले. त्यामुळे डॉ. आनंद माळी व त्यांच्या पथकाने आज शुक्रवारी सकाळी शिवणी गाठले. व त्या इसमाची कसून चौकशी करून त्याला त्याला बुलडाणा येथील रुग्णालयात पाठविले. मलकापूर येथील चार कोरोनाबाधित रुग्णांचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने ते स्वगृही परतल आहेत. (तालुका प्रतिनिधी)