दुसरबीड : सिंदखेडराजा तालुक्यातील केशव शिवनी गावामध्ये १८ फेब्रुवारी रोजी वादळी वाऱ्यासह गारपीट व पाऊस झाला हाेता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या शेतात उभे असलेले पीक होत्याचे नव्हते झाले. या नुकसानाचे सर्वेक्षण महसूल विभागाच्या वतीने सुरू करण्यात आले आहे.
दुसरबीड परिसरात १८ फेब्रुवारी राेजी अचानक वादळासह जाेरदार पाऊस झाला. या पावसामुळे काढणीस आलेला गहू, हरभरा पिकाचे नुकसान झाले. वाळलेल्या ओंब्यामधून गहू गळून पडले. त्यामुळे ताेंडी आलेला शेतकऱ्याचा घास निसर्गाने हिसकावून घेतला. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गहू ,हरभरा ,मका, ज्वारी ,कांदा ,बियाणे प्लॉट कांदा बी देण्याच्या स्थितीत असताना गारपिटीमुळे नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली हाेती. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी नुकसानीचा सर्व्हे करण्याचा आदेश दिला हाेता. त्यानुसार मलकापूर मंडळाचे तलाठी पंकज देशमुख त्याचबरोबर सिंदखेडराजा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे कृषी सहाय्यक केशव शिवणी गावचे कृषी सहाय्यक पूजा खरात, कोतवाल मदन वायाळ यांनी त्वरित केशव शिवणी गावातील शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन नुकसानीचा पाहणी सर्व्हे केला.