लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : डेंग्यू आणि साथजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर खामगाव शहरातील विविध भागात ३१ जणांच्या आरोग्य पथकाकडून किटकशास्त्रीय सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी संशयीत रुग्णांचे रक्त नमुनेही आरोग्य पथकाकडून संकलित करण्यात आले.
जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज चव्हाण आणि सामान्य रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश टापरे यांच्या मार्गदर्शनात शहरात शनिवार आणि रविवारी हिवताप जनजागृती आणि सर्व्हेक्षण मोहिम राबविण्यात आलीे. यामध्ये संशयीत रूग्णांच्या रक्त नमुन्यांची तपासणी करण्यात आली. तसेच साथरोग प्रतिबंधात्मक औषधांचेही वितरण करण्यात आले. त्याचवेळी पालिका प्रशासनाच्यावतीने साथ रोगाचा प्रादूर्भाव आढळलेल्या परिसरात धूर फवारणी करण्यात येत आहे. जीपीएस यंत्रणेद्वारे धुरळणी करण्यात येवून, डेंग्यू आणि साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी पालिका प्रशासनाकडून उपाययोजना केली जात आहे.
या परिसरात केले किटकशास्त्रीय सर्वेक्षण!
शहरातील गोपाळ नगर, गांधी नगर, महाराष्ट्र विद्यालय, केशव नगर, रंभाजी नगर, आईसाहेब मंगल कार्यालय, वामन नगर, समता नगर, बालाजी प्लॉट, पोस्ट आॅफीस, शिवाजी वेस, गोकुळ नगर, स्वामी समर्थ नगर, साबणे ले-आऊट, शिवाजी नगर, अभंग कॉलनी, मुक्तानंद नगर, जुना फैल, सावजी ले-आऊट परिसरात किटक शास्त्रीय सर्वेक्षण करण्यात आले.