मोताळा (जि. बुलडाणा) : शासकीय वसुली कमी व शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण न केल्यामुळे मलकापूरचे उपविभागीय अधिकारी दिनेशचंद्र वानखडे यांनी बुधवारी मोताळा तालुक्यातील सहा तलाठय़ांना निलंबित केले असून, १७ तलठय़ांची एका वर्षासाठी वेतनवाढ रोखली गेली आहे. शासकीय वसुलीबाबत उपविभागीय अधिकारी दिनेशचंद्र वानखडे यांनी २८ जानेवारी २0१५ रोजी आढावा बैठक घेऊन शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत तलाठी वर्गाला निर्देश दिले होते; मात्र १२ मार्च २0१५ रोजी यासंदर्भात उपविभागीय अधिकार्यांनी मोताळा येथील बैठकीमध्ये आढावा घेतला असता, फक्त १0.४0 टक्के एवढी अत्यल्प वसुली तलाठी वर्गाने केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत वारंवार निर्देश देऊनही वसुलीच्या कामामध्ये उदासीनता, वरिष्ठ अधिकार्यांच्या आदेशाचे पालन न करणे, अवैध गौण खनिज उत्खननाचे एकही प्रकरण शोधून न काढणे, अवैध वीटभट्टय़ा सर्रास सुरू असताना त्याबाबत दंडात्मक कारवाईचे प्रस्ताव तहसीलदारांना सादर न करणे आदी कारणांवरून उपविभागीय अधिकारी दिनेशचंद्र वानखडे यांनी मोताळा तालुक्यातील पाच तलाठय़ांना निलंबित केले, तर नऊ तलाठय़ांची एका वर्षासाठी वेतनवाढ रोखली. नांदुरा तालुक्यातील आठ तलाठय़ांची वेतनवाढसुद्धा एका वर्षासाठी रोखण्यात आली आहे. ही कारवाई १६ मार्च रोजी करण्यात आली, मात्र आदेश बुधवारी संबंधितांना मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. शासकीय वसुली कमी असल्याच्या सबबीखाली निलंबित करण्यात आलेल्या तलाठय़ांमध्ये मोताळा तालुक्यातील व्ही. बी. चौधरी (शेलापूर बु.), व्ही. यू. राऊत (आव्हा), बी. ई. पवार (कोथळी), पी. एन. राणे (लिहा बु.) यांचा समावेश आहे, तर अंत्री येथील एन. टी. उज्जैनकर यांना अन्य कारणांसाठी निलंबित करण्यात आले आहे. एका वर्षासाठी ज्या तलाठय़ांची वेतनवाढ रोखली, त्यामध्ये जाधव (सावरगाव), एम. बी. काकडे, रेश्मा चव्हाण, मंदा राठोड, प्रियंका राठोड, रश्मी भेंडे (आडविहीर), डी. पी. चिंचोळकर (डिडोळा) व ढोले (पिंप्रीगवळी) यांचा समावेश आहे. नांदुरा तालुक्यातील तलाठय़ांनीही ७ फेब्रुवारीपर्यंंत वसुलीचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण न केल्याने आठ तलाठय़ांची एका वर्षासाठी वेतनवाढ रोखण्यात आल्याची कारवाई उपविभागीय अधिकरी दिनेशचंद्र वानखडे यांनी केली आहे. या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
पाच तलाठय़ांवर निलंबनाची कारवाई
By admin | Published: March 18, 2015 11:42 PM