मेहकर (बुलढाणा) : सिंदखेड राजा येथे मुक्कामाच्या ठिकाणी न आढळलेल्या मेहकर आगाराच्या ११ वाहन आणि चालकांवर निलंबनाची कारवाई २२ मार्च राेजी करण्यात आली हाेती. या कारवाईच्या विराेधात मेहकर आगारातील कर्मचाऱ्यांनी आंदाेलन करण्याचा इशारा दिला हाेता. त्यामुळे या ११ कर्मचाऱ्यांचे निलंबन २४ मार्च राेजी मागे घेण्यात आले आहे.
मेहकर आगाराच्या बस सिंदखेड राजा येथे मुक्कामी जातात. २२ मार्चच्या रात्री एसटी महामंडळाच्या तपासणी पथकाने सिंदखेड राजा येथील मुक्कामाच्या ठिकाणी भेट दिली हाेती. यावेळी पथकाला बस स्थानकांमध्ये कर्मचारी आढळले नव्हते. त्यामुळे ११ चालक आणि वाहकांना तत्काळ निलंबित करण्यात आले हाेते. ही कारवाई विभागीय कार्यालयाच्या वाहतूक अधीक्षक अपराध यांच्या आदेशाने करण्यात आली हाेती. एसटी महामंडळाच्या सर्व विभागीय कर्मचाऱ्यांनी आपापल्या संघटनेमार्फत या कारवाईचा विराेध केला हाेता. तसेच काम बंद आंदाेलनाचा इशारा दिला हाेता. संघटनांच्या विराेधामुळे ११ ही चालक आणि वाहकांचे निलंबन २४ मार्च राेजी मागे घेण्यात आले आहे.