जळगाव जामोद : तालुक्यातील ग्राम तरोडा बु. शिवारामध्ये १४ मे रोजी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान १० हरणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सोबतच आणखीही सात हरणांचा मृत्यू अशाच प्रकारे झाल्याने ती संख्या १७ वर पोहचली आहे. वन विभागाच्या पथकाने पंचनामा करून हरणांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावली. याप्रकरणाची चौकशी सुरू झाली असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
तरोडा बु गांवचे पोलिस पाटील रितेश हनुमंतराव देशमुख यांनी याबाबतची माहिती वनविभागाला दिली. त्यामध्ये शिवारामधील शेतामध्ये काही हरीण काळवीट मृत अवस्थेत
असल्याचे सांगितले. त्यानुसार जळगाव जामोद वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी
यांनी मोक्यावर जाऊन पाहणी केली. शेत शिवारात पाहणी केली असता ६ मादी
व ४ नर प्रजातीचे मृतावस्थेत आढळले. पंचनामा व इतर
दस्तऐवज तयार करुन वनगुन्हा नोंदवण्यात आला. यावेळी हरिणांचे संपूर्ण अवयव आढळून आले. तसेच नियमानुसार पशुवैद्यकिय अधिकारी यांच्याकडून शवविच्छेदन करुन त्यांच्या शरीराचे आवश्यक भाग गोळा करण्यात आले. नमुने सिलबंद करुन न्याय वैधक प्रयोगशाळेत पुढील तपसाकरीता पाठविण्यात येणार
आहेत. हरीण काळवीट ६ मादी व ४ नर यांना दहन दिले. ही कार्यवाही उपवनसंरक्षक (प्रा) अक्षय गजभिये
बुलडाणा व सहाय्यक वनसंरक्षक आर.आर.गायकवाड, तसेच मानद वन्यजीव रक्षक मंजितसींग शीख, वनपरिक्षेत्र अधिकारी जळगांव जामोद, संरपच, उपसंरपच , पोलिस पाटोल तरोडा बु पशुवैद्यकिय अधिकारी जळगांव जामोद जा. यांचे समक्ष करण्यात आली.
- हरणांचा मृत्यू संशयास्पद
या बीटचा दरोगा कधीही या भागात गस्त घालत नाही. नेहमी जळगावातच असतो. या निष्पाप जिवांचा जीव घेणाऱ्या आरोपीला वन विभागाने तात्काळ शोधून काढावे, सात दिवसात आरोपीला शोधून कडक कारवाई न झाल्यास वनविभागाच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख गजानन वाघ यांनी दिला आहे