खामगाव: तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. अशा अवस्थेत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना दुष्काळी मदत द्यावी, या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी सकाळी कोरड्या विहिरीत आंदोलन केले. पारखेड ता.खामगाव येथे हे आंदोलन करण्यात आले. सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांनी यावेळी दिला.एकीकडे दुष्काळी परिस्थिती असताना, यावर राज्यकर्ते बोलायला तयार नाहीत. शेतकरी देशोधडीला लागत असतांना सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे आंदोलन केल्याशिवाय हे सरकार कुंभकर्णी झोपेतून जागे होत नाही. असा आरोप स्वाभीमानीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे मंगळवारी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. खामगाव तालुक्यातील पारखेड गावात ५० फूट खोल विहिरीत उतरून स्वाभीमानीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. सकाळी सुमारे ९ वाजता आंदोलनाला सुरूवात झाली. बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळ घोषित करण्यात आला; परंतु उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. तुरीचेअनुदानही शेतकऱ्यांना मिळाले नाही. त्यामुळे बळीराजा हताश झाला आहे. शेतकºयांच्या मतांवर निवडून आलेल्या सरकारचे आता शेतकऱ्यांकडेच दुर्लक्ष झाले आहे. परंतु जे शेतकरी कुणाला सत्तेत बसू शकतात; तेच शेतकरी सत्तेतून खालीही खेचू शकतात, हे सरकारने लक्षात घ्यावे. शासनाने याची गंभीर दखल घेतली नाही, तर यापुढे जनतेला एकत्र करून जिल्ह्यात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही, असा इशारा जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांनी दिला. आंदोलनात राजू नाकाडे, संजय लहुडकार, सचिन पाटिल, गजानन धमोडे, अशोक देशमुख, अशोक यादगिरे, संजय नाकडे, अनिल देशमुख, अण्णा कुराडे, लक्ष्मण सोळंके, शिवाजी नाकडे, राम डोंगरदिवे, विजय ताडपते, महादेव पवार, रमेश नाकाडे आदींसह शेतकरी सहभागी झाले. (प्रतिनिधी)
'दुष्काळी' मदतीसाठी 'स्वाभिमानी'चे कोरड्या विहिरीत आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 3:51 PM