लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : येथील नाफेड खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी तूर विकून दोन महिन्यांचा कालावधी उलटला, तरी त्यांना त्याचे चुकारे मिळालेले नाहीत, तसेच मोजपट्ट्या मिळाल्या नाही, तर अनेकांची मोजनोंदही रजिस्टरला घेतलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची खरिपाची पेरणी खोळंबणार असल्याचे पाहून या गलथान कारभाराविषयी रोष व्यक्त करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ३१ मे रोजी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना घेराव घातला होता. दरम्यान, शेतकऱ्यांना तातडीने चुकारे न दिल्यास आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात तुरीचे पीक घेतले आहे. चार पैसे जादा मिळतील, या आशेने त्यांनी आपली तूर नाफेडला दिली आहे; परंतु शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शासकीय तूर खरेदीचे नियोजन चुकले आणि शेतकऱ्यांच्या हातावर मात्र तुरी दिल्या जात असल्याचा प्रकार होत असून, शेतकऱ्यांनी नाफेडला तूर देऊन दोन महिने उलटूनही अद्यापपर्यंत त्यांच्या मालाचे दाम मिळाले म्हणजे चुकारे मिळाले नाही, त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत अडकले असून, याची दखल घेत राज्यशासन आणि नाफेड यांच्याबद्दल रोष व्यक्त करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विनायक सरनाईक, नितीन राजपूत, दीपक सुरडकर, भारत वाघमारे, विलास तायडे, भरत जोगदंडे, अनिल चव्हाण, अनिल वाकोडे व कार्यकर्त्यांनी ३१ मे रोजी जिल्हा मार्केटिंग अधिकारी चिखली येथे आले असता, त्यांना घेराव घालून याप्रकरणी मुख्यमंत्री ना.फडणवीस यांनी लक्ष घालून सात दिवसाच्या आत चुकारे न दिल्यास कारवाईचे आदेश दिले होते; परंतु अद्यापही शेतकऱ्यांना चुकारे न मिळाल्याने तीव्र रोष व्यक्त करीत तुरीचे चुकारे तत्काळ देण्यात यावे व शेतकऱ्यांच्या मोजमापाच्या नोंदी करून मोजमापपट्ट्या देण्यात याव्यात तसेच शेतकऱ्यांची नाफेड केंद्रावरील पिळवणूक थांबण्यात यावी, नोंद झालेली तूर विनाविलंब खरेदी करण्यात आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या, तसेच या मागण्यांची पूर्तता न झाल्यास बेमुदत आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
‘स्वाभिमानी’चा जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना घेराव
By admin | Published: June 03, 2017 12:27 AM