गतवर्षी कोरोना महामारीच्या संकटामुळे शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून निर्बंध लागू केले हाेते़ त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचा माल कवडीमोल भावात विकावा लागला़ त्यानंतर कशीतरी खरिपाची पेरणी केली़ दरम्यान, सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली़ बियाण्यांच्या नुकसानभरपाईपोटी काही लोकांना मदत मिळाली; तर ज्या शेतकऱ्यांनी खासगी बियाणे विकत घेतले होते, त्यांना ती मिळाली नाही़ मूग, उडीद तोडणीवेळी संततधार पाऊस झाल्याने तोडणी पूर्ण खराब झाली; तसेच सोयाबीन हंगामात पावसामुळे सोयाबीनच्या झाडांवरच शेंगांना कोंब आले होते़ त्यामुळे त्या पिकाचीसुद्धा नासाडी झाली़ त्याचा परिणाम कपाशीवरसुद्धा झाला़ शेतीला लागलेला खर्च वसूल झाला नसल्याने गतवर्षी बँकेकडून काढलेले कर्ज भरू शकले नसल्यामुळे त्या कर्जाचे पुर्नगठण करून परत शेतकऱ्यांना वाटप करून द्यावे. विविध समस्यांमुळे शेतकरी संकटात सापडला आहे़ आता पेरणीचे दिवस तोंडावर आले असल्याने पेरणी कशी करावी या विवंचनेत शेतकरी असून शेतकऱ्यांच्या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांच्या नेतृत्वात लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू परिसरातील भूमराळा दरी येथे चक्क दगडाची पेरणी करून शासनाच्या निषेध व्यक्त केला़ यावेळी लोणार तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल मोरे, सचिव अनिल लांडगे व शेतकरी उपस्थित होते़
पीकविम्यापासून शेतकरी वंचित
अतिवृष्टीमुळे जवळपास सर्व पिकांचे नुकसान झाल्याने शासनाने काही भागांतील शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत दिली तर काही भागांतील शेतकऱ्यांना अद्यापही आर्थिक मदत म्हणून काहीच मिळाले नाही़ निसर्गाच्या प्रकोपाने पिकाची नुकसान झाल्यास भरपाई मिळविण्याकरिता पंतप्रधान पीक विमा योजनाअंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांनी विमा रक्कम भरली़; परंतु नुकसानभरपाईचे ऑनलाइन कारण दाखवून अद्यापही शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळाली नाही; तसेच कित्येक शेतकरी पंतप्रधान सन्मान योजनेपासून वंचित आहेत.