मलकापूर : पिककर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या शाखाधिकाऱ्या विरुध्द गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी शनिवारी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दाताळ्यात सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या स्थानीय शाखेस काळे फासले. तसेच बोर्डाचीही मोडतोड केली. या आंदोलनात सहभागी होवून शेतकरी संघटनेनेही समर्थन दिले. ६० कार्यक़र्त्यांना ग्रामीण पोलीसांनी स्थानबध्द केले. गुरुवारी तालुक्यातील मौजे उमाळीतील शेतकऱ्याच्या पत्नीस पिक कर्जासाठी बँक व्यवस्थापकाने शरीरसुखाची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. त्या निषेधार्थ स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवारी दाताळ्यात गदारोळ माजवीला. सेंट्रल बँकेच्या शाखेस काळे फासण्यात आले. व बोर्डाची तोडफोड करण्यात आली.या घटनेची वार्ता कळताच ग्रामीण पोलीस निरीक्षक बी.आर.गावंडे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्वाभीमानीचे विदर्भ अध्यक्ष देवेंद्र भुसार, पश्चिम विदर्भप्रमुख चंद्रशेखर चंदन, विधानसभा प्रमुख शशीकांत संबारे, अमोल राऊत, विवेक पाटील, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष दामोधर शर्मा, पुंजाजी देवीकार, प्रदीप शेळके, सुनिल पाटील आदीसह ६० जणांना स्थानबध्द केले. या आंदोलनाला शेतकरी संघटनेने समर्थन दिले.
राष्ट्रवादीचे पोलीसांना निवेदन !मलकापूर तालुक्यात पिक कर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीला शरीरसुखाची मागणी करणारी बाब संतापजनक असल्याच्या धरतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने पक्षनेते संतोषराव रायपुरे यांच्या नेतृत्वात या घटनेचा निषेध करण्यात आला व कडक कारवाई तथा आरोपींना तात्काळ अटकेची मागणी पोलीस निरीक्षक बि.आर.गावंडे यांच्याकडे करण्यात आली. या निवेदनावर संतोषराव रायपुरे, तालुकाध्यक्ष माधवराव गायकवाड, शहराध्यक्ष शाहीद शेख, पं.स.सदस्य सुरेश पाटील, पुरुषोत्तम रायपुरे, बबनराव तायडे, संदीप गायकवाड, सुखदेव चांदेलकर आदीसह असंख्य सह्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)