सध्या जिल्ह्यामध्ये विद्युत वितरण कंपनीच्या वतीने घरगुती वीज बिल व शेतकऱ्यांकडून वीज बिलाच्या वसुलीचा सपाटा सुरू आहे. शहरी व ग्रामीण भागामध्ये सक्तीची वीज बिल वसुली विद्युत वितरण कंपनीतर्फे सुरू असून, त्याच्या विरोधामध्ये बुलडाण्यामध्ये अधीक्षक अभियंत्यांच्या मुख्य कार्यालयाची वीज रविकांत तुपकर यांनी कापली व अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयामध्ये ठाण मांडून बसले. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मेहकर येथील उपविभागीय अभियंत्यांच्या कार्यालयीन दालनात स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वामध्ये कार्यकर्त्यांना घेऊन आंदाेलन करण्यात आले. दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यानंतर विद्युत वितरण कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी नमते घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चुकीचे बिल तात्काळ दुरुस्ती करून देण्यात यावे, नंतरच वीज बिल भरून घेण्यात यावे. नोटीस न देता कुठलेही कनेक्शन कापण्यात येऊ नये. लाइनमन शेतकरी व ग्राहकांशी सौजन्याने वागत नाहीत. ग्राहकांशी चर्चा न करता व नोटीस न देताच वीज कनेक्शन खंडित करतात. हे वीज धोरणाच्या विरोधात असून, यानंतर खपवून घेतले जाणार नाही, असे ठणकावून सांगण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महावितरणच्या कार्यालयात ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 4:34 AM