‘स्वाभिमानी’ची ५० जागा लढण्याची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 02:20 PM2019-07-09T14:20:48+5:302019-07-09T14:21:03+5:30
महाआघाडीत सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्यासाठी राज्यातील ५० विधानसभा मतदारसंघात चाचपणी सुरू केली आहे.
अकोला: लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीत सहभागी असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विधानसभा निवडणुका लढविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस महाआघाडीत सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्यासाठी राज्यातील ५० विधानसभा मतदारसंघात चाचपणी सुरू केली आहे. या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांना विचारणा केली असता त्यांनी स्वबळाच्या शक्यतेला दुजोरा दिला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने स्वाभिमानीचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून रणनीती आखल्याची माहिती आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसोबत सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रबळ आघाडी तयार व्हावी हा त्यांचा मानस आहे; मात्र या आघाडीत सन्मानजनक जागा मिळत नसतील तर सर्व पर्याय खुले ठेवण्याचीही भूमिका त्यांनी मांडली आहे. राज्यातील २८८ पैकी ५० विधानसभा मतदारसंघात प्रसंगी स्वबळावर लढण्यासाठी तयारीला लागण्याचेही निर्देश त्यांनी पदाधिकाºयांना दिले आहेत.
मनसेसोबतही आघाडीची चर्चा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. या चर्चेमधून आगामी काळात हे दोन पक्ष एकत्र येतील का, असे अंदाज राजकीय क्षेत्रात बांधले जात आहेत. याबाबत मात्र स्वाभिमानीचे नेते आताच काही बोलायला तयार नाहीत.
स्वाभिमानीने सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. आघाडीमध्ये सन्मानजनक जागा मिळाल्या पाहिजेत हा आग्रह राहणारच आहे; मात्र पक्ष म्हणून आम्हालाही स्वबळाची ताकद निर्माण करावी लागणारच आहे. त्यासाठी राज्यातील ५० मतदारसंघांवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. आॅगस्ट महिन्यात होणाºया कार्यकारिणीच्या बैठकीत यासंदर्भात सविस्तर चर्चा होणार आहे.
- रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना