- नीलेश जाेशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या १६ महिन्यापासून कोरोना संक्रमणामुळे विविध क्षेत्राला फटका बसलेला असतानाच स्वच्छ भारत मिशनही (ग्रामीण) प्रभावीत झाले आहे. गेल्या आर्थिक वर्षात घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासंदर्भात निवडण्यात आलेल्या जिल्ह्यातील ५० गावांपैकी केवळ १४ गावांमध्येच प्रत्यक्षात कामाला प्राधान्य देता आलले आहे. स्वच्छ भारत मिशनच्या पहिल्या टप्प्यात प्राधान्याने शौचालय निर्मितीला प्राधान्य देण्यात आले होते. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागातील घनकचरा व सांडपणी व्यवस्थापनाला प्राधान्य देण्यात येत आहे. गावातील लोकसंख्येच्या आधारावर संबंधित गावात अनुषंगीक व्यवस्थापनासाठी निधी दिल्या जातो. यामध्ये १५ व्या वित्त आयोगातून ३० टक्के आणी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ७० टक्के निधी दिल्या जातो. त्यातून ही कामे मार्गी लावण्यात येत आहेत. दरम्यान २०२०-२१ या आर्थिक वर्षात ५० गावांची घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी निवड झाली होती. सोबतच या गावांमधील कामाला प्रशासकीय मान्यता ही देण्यात आली होती. दरम्यान कोरोनाचे संक्रमण वाढल्यामुळे या ५० पैकी फक्त १४ गावाताच कामांना प्रारंभ झाला होता. ३६ गावातील कामे प्रलंबीत होती. विशेष म्हणजे या कामांसाठी पंचायत समितीनिहाय एकूण १ कोटी ४५ लाख ६७ हजार ८६५ रुपयांचा निधीही अदा करण्यात आला होता. प्रामुख्याने स्वच्छ भारत मिशनच्या या दुसऱ्या टप्प्यात प्रदुषणाचे प्रमाण कमी करण्यावर भर दिला जात आहे.दरम्यान काेराेनाचे संक्रमण आता कमी झाले आहे. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षातील कामे आणि नव्याने करण्यात येणाऱ्या कामांचा वेग वाढण्यास मदत हाेईल, असा अंदाज व्यक्त हाेत आहे.
महिन्याकाठी ३५१ टन घनकचराया गावांमध्ये महिन्याकाठी साधारणत: ३५१ टन घनकचरा निर्माण होतो. त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून गाव परिसरात होणारे प्रदुषणही कमी करण्यावर भर दिला जात आहे. साधारणत: ४४ दिवसामंध्ये अेाल्या कचऱ्यापासून खत निर्माण होणारा, अेाला व सुक्या कचऱ्यापासून गांडूळखत निर्मिताला प्रसंगी यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. यासोबतच ग्रामपातळीवरील धोकादायक कचरा, निष्क्रिय कऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने यात तंत्र विकसीत करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. पण कोरोनामुळे या उपक्रमाची व्याप्ती मधल्या काळात वाढविता आली नाही.