- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या सात महिन्यापासून ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये स्थिरावलेल्या टी-१ सी-१ वाघामुळे आता बुलडाणा, अकोला आणि जळगाव जिल्ह्यातील अभयारण्याच्या संवर्धनासोबतच टायगर कॉरिडॉर निर्मितीला चालणा मिळण्याचे संकेत आहेत.ज्ञानगंगा अभयारण्यातीलवाघाच्या अधिवासाबद्दल एक समिती नियुक्त करण्यात आलेली असून मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संचालक एम. एस. रेड्डी अध्यक्ष असलेल्या या समितीची सोमवारी व्हीसी झाली. त्यास वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे डॉ. बिलाल हबीव, अकोला विभागीय वन्यजीव अधिकारी एम. एन. खैरनार व अन्य सदस्य या बैठकीस उपस्थित होते. त्यामध्ये ज्ञानगंगा अभयारण्य हे वाघाच्या अधिवासासाठी योग्य असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला असून भविष्यातील वाघाच्या अधिवासाचा विस्तार होण्याची शक्यता पाहता अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा, बुलडाणा जिल्ह्यातील अंबाबरवा आणि जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई भवानी अभयारण्याचे त्यादृष्टीने संवर्धन करून टायगर कॉरिडॉर निर्मितीच्या दृष्टीने विचार मंथन झाले. या चारही ठिकाणी वाघाच्या अधिवासासाठी स्थिती योग्य असल्याचे मत या व्हीसीमध्ये व्यक्त करण्यात आले आहे. दरम्यान जवळपास १७०० किमीचा प्रवास करून टी-१-सी-१ हा ज्ञानगंगामध्ये आला आहे. येथील अधिवास वाघाच्या अस्तित्वासाठी पुरक असल्यानेच तो येथे थांबला आहे. त्यामुळे येथे या आता प्रोढ झालेल्या वाघासाठी वाघिण आणण्यासंदर्भातही सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुषंगाने कोवीड संसर्गचा स्थिती व पुढील निधीचा प्रश्न हे मुद्दे अभ्यासून सहा महिन्यांतर अनुषंगीक विषयावर निर्णय घेण्याबाबत चर्चेमध्ये एकमत झाल्याची माहीती सुत्रांनी दिली. पेंच किंवा ताडोबा अभयारण्यातून सहजतेने टी-१ सी-१ ला सहचारीणी मिळण्यात अडचण नसल्याचेही समोर आले आहे.
ज्ञानगंगाचा अधिवास वाघांसाठी योग्यज्ञानगंगा अभयारण्याचा अधिवास हा वाघांसाठी योग्य असल्याचा निष्कर्ष यासंदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या समितीने काढला असून ज्ञानगंगामध्ये प्रती चौरस किमी १८ प्राणी असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा दर अपेक्षा पेक्षा खूप अधिक आहे. सध्याच १३ पेक्षा अधिक बिबट या अभयारण्यात असल्याने हिंस्त्र प्राण्यांसाठी आवश्यक असणारी अन्न साखळी व त्यातल्या त्यात वाघांसाठी आवश्यक असलेले खाद्य येथे उपलब्ध आहे., चितळ, सांबळ, नील गाय, रानडुक्कर यांचीही संख्या येथे अधिक आहे, त्यामुळेच टी-१सी-१ येथे थांबलेला आहे.
ज्ञानगंगाचा विस्तार आवश्यकज्ञानगंगा अभयारण्याचा विस्तार २०५ चौरस किमी आहे. वाघांसाठी सरासरी ८०० ते एक हजार चौरस किमी विस्तार असलेले जंगल आवश्यक आहे. त्यादृष्टीनेच काटेपूर्णा, अंबाबरवा आणि मुक्ताई भवानी अभयारण्याचा कॉरिडॉर विकसीत करण्याच्या दृष्टीने सध्या मंथन सुरू आहे.