खामगाव : चालू आर्थिक वर्षाची ५ कोटी १२ लाख ७0 हजार रुपये कराची मागणी व मागील ३ कोटी ४३ लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी पालिकेने आर्थिक वर्ष समाप्तीच्या पृष्ठभूमीवर धडक मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, कराचा भरणा न करणार्या काही व्यापारी प्रतिष्ठानांसह मालमत्ताधारकांकडून मालमत्ता जप्त करण्याच्या दृष्टीने पालिकेने पावले टाकली आहेत. प्रसंगी सोमवारी आनुषंगिक कारवाई करण्याची शक्यता पालिकेतील सूत्रांनी व्यक्त केली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी पालिका म्हणून खामगाव पालिकेचा लौकिक आहे. जवळपास ९७ हजार लोकसंख्या असलेले खामगाव शहर जिल्ह्याची मोठी बाजारपेठ म्हणूनही ओळखले जाते. त्यानुषंगाने शहरातील काही व्यापारी प्रतिष्ठानांकडे पालिकेचा तीन ते चार वर्षांंपासूनचा कर थकीत आहे. त्यातच पालिकांना यावर्षी किमान ९0 टक्के करवसुलीचे उद्दिष्ट नगरविकास विभागाकडून देण्यात आले आहे. सोबतच पायाभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी पालिकांना करवसुलीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. या सुविधांच्या दर्जावरच पालिकांना येत्या काळात राज्य शासनाकडून अनुदान मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी पालिकांना करवसुलीच्या उद्दिष्टाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने आता उर्वरित दीड महिन्यांत वेगवान हालचाली करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळेच पालिकेने करवसुली मोहीम हाती घेतली आहे.
थकीत करापोटी जप्तीची कारवाई!
By admin | Published: February 12, 2016 2:04 AM