दरम्यान, टिप्पर चालक विवेक रॉय यास किनगाव राजा पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच उशिरा अटक केली होती, तर ज्या कंत्राटदाराकडे हे मजूर काम करत होते, त्याचा शोध सध्या किनगाव राजा पोलीस घेत आहेत. समृद्धीच्या कामाचे तुकडे पाडण्यात आले आहेत. त्यामुळे विविध कंत्राटदारांच्या माध्यमातून येथील काम सुरू होते. परिणामी, नेमका कंत्राटदार कोण याचा शोध आम्ही घेत असल्याचे ठाणेदार सोमनाथ पवार यांनी सांगितले. दुसरीकडे डीआयजी चंद्रकिशोर मीना यांनीही या घटनेचे गांभीर्य पाहता, २१ ऑगस्ट रोजी घटनास्थळाची पाहणी करून, पोलिसांनी दाखल गुन्ह्यात तपासाअंती काही कलमे दाखल करण्याची सूचना दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
--उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केली पाहणी--
अपघाताचे गांभीर्य पाहता, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनीही तढेगाव फाटा येथील अपघात स्थळाची पाहणी केली. सोबतच वाहणाची पडताळणी करून, अपघातासंदर्भात कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न केला.