चिखली : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप करून त्यांची बदनामी करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना बडतर्फ करा, अशी मागणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात राज्याचे मुख्य सचिव यांना तहसीलदारांमार्फत २७ मार्च रोजी निवेदन देण्यात आले. या निवेदनात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे स्वच्छ प्रतिमा असलेले नेते आहेत. गेली अनेक वर्ष ते राजकीय आणि सामाजिक जीवनात कार्यरत असून, आमदार, राज्यमंत्री म्हणून त्यांनी शासनातील अनेक खात्यात उल्लेखनीय काम केलेले आहे. एक यशस्वी मंत्री म्हणून त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे. गृहमंत्री म्हणून उत्तम कामगिरी केल्याबद्दल विशेषत: कोरोना काळात केलेले कार्य पाहून त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित केले आहे. मात्र, हिरेन मृत्यूप्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होताना व त्याचे धागेदोरे परमबीर सिंग यांच्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण होत असताना स्वत:ला कारवाईपासून वाचवण्यासाठी आणि तपासाची दिशा बदलण्यासाठी परमबीर सिंग यांनी बिनबुडाचे तथ्यहीन आरोप केले आहेत. राज्य शासनाची प्रतिमा मलिन करणे, गृहमंत्र्यावर तथ्यहीन आरोप करणे, त्यांची बदनामी करणे, राज्य शासनाच्या विरोधात षडयंत्र रचणे आदी बाबींचा गांभीर्याने विचार करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी तसेच त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी आणि राज्य शासनाने त्यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करावा, अशी मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. परमबीर सिंग यांनी केलेल्या खंडणीचा आरोपांचा व त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन प्रदेश प्रतिनिधी शंतनू बोंद्रे, शहराध्यक्ष रवींद्र तोडकर, जिल्हा उपाध्यक्ष मनोज दांडगे, शहर उपाध्यक्ष प्रमोद चिंचोले, नगरसेवक डॉ. प्रकाश शिंगणे, प्रशांत एकडे, शेखर बोंद्रे, प्रमोद पाटील, नीलेश देशमुख, कृष्णा मिसाळ, निंबाराव देशमुख, प्रशांत डोंगरदिवे, दिनेश आढवे, कल्पना केजकर, विशाल काकडे, संकेत पाटील, शिवाजी शिराळे, दत्ता खत्री, प्रसाद पाटील, राहुल घेवंदे, दीपक कदम आदींसह कार्यकर्ते यांनी दिले.