चिखली : ट्रान्सफॉर्मर नादुरुस्तीचा अहवाल देऊ नये, अशा सूचना देणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंत्यांवर कारवाई करण्याची मागणी आ. श्वेता महाले पाटील यांनी जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांच्याकडे केली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात ग्रामीण भागातील कृषी, गावठाण आणि पाणीपुरवठा योजनेचे शेकडो ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झालेले आहेत; परंतु वीज वितरण कंपनी बिले भरल्याशिवाय ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती करून देत नाही. एवढेच नव्हे तर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त असल्याचा अहवाल देऊ नये, अशा स्पष्ट सूचना अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी बुलडाणा यांनी गाव, तालुका, विभाग व गाव पातळीवरील कर्मचाऱ्यांना दिलेल्या असल्याचे वीज वितरण कंपनीमधील कर्मचारी सांगत आहे. शासनाने ८० टक्के वीज बिल वसुली करावी, असा आदेश दिलेला आहे. सदर आदेशात नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरचा नादुरुस्त अहवाल बिले भरल्याशिवाय देऊ नये, असा कुठेही उल्लेख नसताना अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी यांनी ट्रान्सफॉर्मरचा नादुरुस्त अहवाल देण्यात येऊ नये, असे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांनी शासनाच्या आदेशाचा विपरीत अर्थ काढून वीज ग्राहकांना वेठीस धरत आहे. नादुरुस्त अहवाल दिल्यानंतर ठराविक कालावधीमध्ये नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर देणे बंधनकारक असल्याने अहवालच देऊ नये, अशा तोंडी सूचना त्यांनी दिलेल्या असल्याचे त्यांचे कर्मचारी सांगत, असल्याचा आरोप आ. महालेंनी केला आहे. शासनाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही महाले यांनी पत्रात केली आहे़