त्या पालकांचा कर माफ करावा
सिंदखेडराजा : शहरातील कोरोनाच्या आपत्तीत सापडलेल्या कुटुंबाला पालिकेने एक वर्षाचा मालमत्ता कर व पाणी कर माफ करून मदत करावी, अशी मागणी शहर काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे त्याच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे.
आदर्श ग्राम याेजनेत सावडदचा समावेश
सिंदखेडराजा : तालुक्यातील सवडद येथे आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती, पुणे यांच्या तांत्रिक चमूने ७ जून रोजी सकाळी भेट देऊन गाव फेरी व शिवारफेरी करून आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजना राबवण्यासाठी गावाची निवड केल्याची घोषणा केली. यावेळी आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती पुणे येथील कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी ग्रामस्थांना ऑनलाईन मार्गदर्शन केले़
तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतला आढावा
बिबी : तालुक्यातील विविध कोविड लसीकरण केंद्रांना भेटी देऊन लसीकरण आणि टेस्टिंग करण्याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किसन राठोड यांनी आढावा घेऊन योग्य सूचना व मार्गदर्शन केले. येथील ग्रामीण रुग्णालय येथे भेट देऊन सुरु असलेल्या लसीकरणाबाबत माहिती घेण्यात आली.
सुंदर गाव स्पर्धेत सहभागी व्हा
बुलडाणा : शासनाच्या ग्राम विकास विभागाने २० मार्च २०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार आर.आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना जाहीर केलेली आहे. या योजनेकरिता कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून देण्यात आलेला आहे. या याेजनेत सर्वच ग्रामपंचायतींनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद, बुलडाणा यांनी केले आहे.
सर्वच शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे द्या
बुलडाणा : कृषी विभागाच्या आवाहनानुसार अनुदानित बियाण्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. परंतु आजही असंख्य शेतकरी बियाण्यांपासून वंचित असल्याने ऑनलाईन अर्ज करुन प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे देण्यात यावे, अशी मागणी हाेत आहे़
वीर पत्नींना तत्काळ सेवेत घ्या
बुलडाणा : वीर पत्नी यांना तत्काळ राज्य सेवेत सामावून घ्यावे आणि कोरोना काळात कर्तव्य निभावताना निधन झालेल्या शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक कामांसाठी तरतूद करावी. तसेच २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या वीरपत्नी यांना सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी शासकीय पुनर्वसन माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर ठेंग यांनी केली आहे़
माेताळा येथे काॅंग्रेसचे आंदाेलन
माेताळा : केंद्र शासनाच्या वतीने पेट्रोल, डिझेल व गॅसची करण्यात आलेली भरमसाठ दरवाढीविरोधात मोताळा येथे पेढे वाटून गांधीगिरी केली. यावेळी काँग्रेसच्या वतीने केंद्र शासनाच्या विरोधात नारेबाजी करून आक्रोश व्यक्त करत जाहीर निषेध करण्यात आला. आंदोलन प्रसंगी काँग्रेस नेते तुळशीराम नाईक ,माजी सभापती मिलिंद जैस्वाल,मातंग एकता आंदोलन समिती जिल्हा अध्यक्ष सोपानराव पानपाटील, एकनाथ चव्हाण, अभिषेक देशमुख ,गोपाल मापारी, डोंगर सिंग मछले, सुधाकर सहावे यासह काँग्रेस कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
दाेन महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन रखडले
लाेणार : प्रभारी गटशिक्षणाधिकारी सेवानिवृत्त झाल्यानंतर पद रिकामेच असल्याने तालुक्यातील जि.प. शिक्षकांचा गेल्या दोन महिन्यांपासून पगार झाला नसल्याचे चित्र आहे. प्रभारी शिक्षणाधिकारी अशोक ठोंबरे हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानंतर पंचायत समितीतील गटशिक्षणाधिकारी पद रिक्तच असल्याची परिस्थिती आहे़
रिक्तपदांमुळे नगरपंचायतचे कामकाज खाेळंबले
माेताळा : येथील नगरपंचायतमध्ये अनेक पदे रिक्त आहेत़ त्यामुळे नगरपंचायतचे कामकाज कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बळावर सुरू आहे़ काही कंत्राटी कर्मचारी मनमानी कारभार करीत असल्याचे चित्र आहे़ याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी हाेत आहे़