सुधीर चेके पाटील
चिखली : जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाची झळ सर्वच क्षेत्राला बसली. अशीच झळ तालुक्यातील पळसखेड सपकाळ येथील निराधार, बेवारस आणि मनोरुग्णांचा हक्काचा निवारा असलेल्या 'सेवासंकल्प प्रतिष्ठान'ला देखील बसली हाेती. कोरोनामुळे धडधाकट माणसांच्या पोटापाण्याचा प्रश्न उद्भवलेला असताना केवळ दानशूरांच्या मदतीवर अवलंबून असलेल्या सेवासंकल्पातील ९७ मनोरुग्णांचा उदरनिर्वाह भागविण्याच्या दिव्यातून प्रतिष्ठानला जावे लागत असले तरी काही प्रमाणात ही आपत्ती प्रतिष्ठानसाठी इष्टापत्ती देखील ठरली आहे.
समाजातील अनेक निराधार, बेवारस आणि मनोरुग्ण किंवा शरीराने जर्जर होऊन रस्त्यावर बेवारस असलेल्या गोरगरीब व्यक्तींसाठी 'सेवा संकल्प प्रतिष्ठान' हे हक्काचं घर उभे करून त्यांचा सांभाळ करण्याचे काम डॉ. नंदकिशोर व डॉ. आरती पालवे यांच्याव्दारे केल्या जाते. हा प्रकल्प पूर्णत: समाजातील दानशूरांच्या मदतीवर अवलंबून आहे. या प्रकल्पावर आजरोजी ९७ मनोरुग्णांचा सांभाळ केला जात आहे. दरम्यान, 'लॉकडाऊन' काळात सर्वांचेच अर्थचक्र बिघडल्याने प्रतिष्ठानला होणारी मदत काही प्रमाणात कमी झाल्याने प्रकल्पावरील रुग्णांचा उदरनिर्वाह मध्यंतरी बिकट बनला होता. या बिकट काळातही काही दानशूरांनी सढळ हाताने मदत केल्याने अन्नधान्य व किराण्याचा प्रश्न सुटू शकला.
प्रकल्पावरील मनोरुग्णांच्या पोटापाण्यासह त्यांच्या आरोग्याची योग्य तऱ्हेने देखभाल होत असताना प्रकल्पाला कोरानाची बाधा होऊ न देणे ही मोठी जबाबदारी या काळात पालवे दाम्पत्याने लीलया पार पाडली आहे. प्रकल्पावरील मनोरुग्णांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रकल्पाला भेट देण्यास इच्छुक विविध समाजसेवी संस्था व व्यक्तींना नम्रपणे नकार देण्यात आला. तथापि नवीन रुणांना प्रकल्पावर दाखल करून घेणेही थांबविण्यात आले होते. मात्र, अशा कठीण काळातही चार नवीन मनोरुग्ण महिलांची इतरत्र कोणतीही व्यवस्था नसल्याने त्यांना दाखल करून घेण्यात आले. मात्र, त्यांना १४ दिवस विलगीकरणात ठेवण्यासह, खबरदारीचे सर्व उपाय काटोकोरपणे पाळण्यात येऊन प्रकल्पातील सर्वांचा सांभाळ या कठीण काळातही पालवे दाम्पत्याने मोठ्या धैर्याने व नेटाने पार पाडला आहे. या प्रकल्पात आज रोजी ९७ मनोरुग्णांचा सांभाळ होतो. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी दररोज साधारणत: ३८ किलो पीठ............. याप्रमाणे एका हप्त्याला ७............... क्विंटल तर वर्षाला ८४............... क्विंटल धान्याची गरज भासते. या शिवाय दाळी, तेल, तांदूळ, किराणा, औषधी, कपडे आदी सर्व जीवनावश्यक वस्तूंची गरज भासते. या सर्व गरजा समाजातील दानशूरांवर अवलंबून आहेत.