लोणार : येथील जमजम कॉलनी तथा नवी नगरी या भागात मोकाट कुत्रे आणि डुकरांचा हैदाेस सुरू आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे, तसेच ते लहान मुलांच्या अंगावर धाव घेत आहेत. माेकाट कुत्र्यांसह डुकरांचा बंदाेबस्त करण्याची मागणी मोहम्मद रिजवान मोहम्मद नासेर (जडडा), सेक्रेटरी जमियत उलमाए हिंद शाखा लोणार यांनी मुख्याधिकारी न.प., लोणार यांच्याकडे केली आहे.
रिजवान जडडा यांची चार वर्षीय मुलगी घरासमोर खेळत असताना एका मोकाट कुत्र्याने तिच्या अंगावर धाव घेऊन चावा घेतले. तिला ताबडतोब खाजगी रुग्णालयात दाखल करावे लागले. तिची प्रकृती चांगली असून, उपचार सुरू आहेत. या समस्येचा गांभीर्याने विचार करून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. हा प्रश्न न सुटल्यास नगर प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.
या अगोदरसुद्धा उपरोक्त समस्येबाबत जमजम कॉलनी व नवी नगरी येथील समस्त नागरिकांनी लेखी तक्रार केली होती; परंतु यावर नगरपालिका प्रशासनाच्या वतीने दखल घेतली गेली नाही. याचाच परिणाम काल माझ्या चारवर्षीय लहान मुलीला भोगावा लागला. एखादा अनुचित प्रकार घडला तर याची जबाबदारी संबंधित विभाग व विभाग प्रमुखाची राहील, अशी प्रतिक्रिया रिजवान जडडा यांनी व्यक्त केली.