मेहकर : शहरातील रस्त्याचे काम सुरू असताना रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी वाढलेली असून यामुळे अपघाताचे प्रमाण सुध्दा वाढले आहे. मोळा येथील रहिवासी करण महादेव धोटे यांचा काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात मृत्यू झाला हाेता. या रस्त्यावर अपघात हाेऊ नये यासाठी उपाययाेजना करण्याची मागणी मानव सुरक्षा सेवा संघाच्या वतीने ठाणेदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
मेहकर शहरातील मुख्य रस्त्यावर काम सुरू असून त्यामुळे मेहकर शहरातून जाणारी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली आहे. हा रस्ता नेहमी वर्दळीचा असून या रस्त्यावर एका तीन वर्षाच्या मुलाचा अपघात झाला होता. या रस्त्यावर होणाऱ्या जड वाहनांच्या वाहतुकीमुळे हे घडले असून येणाऱ्या काळात असे अपघात होऊ नयेत म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे व यासाठी जड वाहने गावाबाहेरून काढावीत आणि शहरातील वाहतुकीचे नियम लागू करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी मुन्ना काळे, सुनील मोरे, प्रवीण पऱ्हाड, उमेश शीलवंत, गजानन लादे, संतोष झोपाटे, राजश्री पाटील, प्रकाश सुखदाने, झोपाटे, विजयानंद वायाळ आदी उपस्थित हाेते.