लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शेतकऱ्याकडून अवघ्या ५०० रुपयाची लाच घेताना एका तलाठ्यास अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई मंगळवारी सकाळी जळका तेली येथे केली. खामगाव तालुक्यातील खेडी येथील एका शेतकऱ्याकडून मृत्यूपत्रात नोंद करण्यासाठी तसेच सातबारावर विहिरीची नोंद करून देण्यासाठी तलाठी गजानन नारायण मान्टे (४३, रा. तायडे कॉलनी) यांनी ७०० रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ५०० रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, याबाबत संबंधीत शेतकऱ्याने बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी पडताळणी करून सापळा रचून जळका तेली येथे तलाठी मान्टे यांना तक्रारदार शेतकऱ्याकडून ५०० रुपयाची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. ही कारवाई एसीबीचे पीआय सचिन इंगळे, विलास साखरे, मोहम्मद रिजवान, विनोद लोखंडे, अझरोद्दीन काझी, स्वाती वाणी, नितीन शेटे यांनी लाच लुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
शेतकऱ्याकडून ५०० रुपयाची लाच घेताना तलाठ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 12:09 PM