चिखली (बुलडाणा) : नायब तहसीलदारांच्या शेकडो बनावट सहय़ा, बोगस फेरफार तसेच बनावट अकृषक आदेशाच्या चौकशी प्रकरणात दोषी आढळून आलेले तलाठी रियाज शेख यांना एसडीओंच्या आदेशान्वये निलंबित करण्यात आले आहे. चिखली भाग १ चे तत्कालीन तलाठी रियाज शेख यांनी चिखली येथे कार्यरत असताना तत्कालीन सेवानवृत्त नायब तहसीलदार मोरे यांच्या बनावट सहय़ा करून खोटे फेरफार रुजू केले होते. कर्तव्यात कसूर व फौजदारी स्वरूपांचे गंभीर कृत्य केल्याच्या तक्रार मनसेने केली होती. दरम्यान, ना. तहसीलदार विजय पाटील व तहसीलदार विजय लोखंडे यांनी याबाबत उपविभागीय अधिकारी बाळासाहेब तिडके यांच्याकडे अहवाल सादर केला. त्यानुसार एसडीओ तिडके यांनी तलाठी रियाज शेख यांना २४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १७७९ अन्वये निलंबित केले आहे. दरम्यान, तलाठी शेख यांचा वादग्रस्त सेवाकाळ पाहता फौजदारी स्वरूपाचे गंभीर आरोप असतानाही एसडीओ तिडकेंची भूमिका ही संशयास्पद असल्याचा आरोप मनसे शेतकरी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप भवर यांनी केला असून, तलाठी शेख यांना बडतर्फ न करता एसडीओ तिडके यांनी आर्थिक चिरीमिरी करून केवळ निलंबित केले असल्याने, त्यांना तत्काळ बडतर्फ करून फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय अथवा तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा शैलेश गोंधणे यांनी दिला आहे.
तलाठी रियाज शेख निलंबित
By admin | Published: March 01, 2016 1:26 AM