एकूण नऊ सदस्य संख्या असलेल्या तीन वाॅर्डातील ग्राम विकास आघाडीचे चार सदस्यांची अविरोध निवड गावकऱ्यांनी केली आहे. उर्वरित पाच जागांसाठी मतदान होणार आहे. ग्राम विकास आघाडीच्या तीन वाॅर्डातील पाच उमेदवारांच्या विरोधात तीन उमेदवार रिंगणात आहेत. त्यातील दोन उमेदवार प्रत्येकी दोन ठिकाणी निवडणूक लढवित आहेत. माजी सरपंच विमल कदम यांच्या नेतृत्वात सिंदखेड गावाने पाणी फाउंडेशन चा राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार, जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कार यासारख्या अनेक पुरस्कार मिळवित गावाची शाश्वत विकासाकडे वाटचाल सुरू केली होती. समाजसेविका सिंधूताई सपकाळ, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, भास्करराव पेरे पाटील यांनी गावात येऊन विकास कामाबाबत गावकऱ्यांचे कौतुक केले होते. १५ जानेवारी रोजी पार पडणाऱ्या निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. वाॅर्ड क्रमांक एक मध्ये रमाबाई रोहिदास खैरे यांची अविरोध निवड झाली. उर्वरित दोन जागांसाठी निवडणूक रिंगतदार ठरत आहे. वाॅर्ड क्रमांक दोनमध्ये जिजाबाई रामेश्वर कापसे यांची अविरोध निवड झाली आहे. वाॅर्ड क्रमांक तीनमध्ये शारदा विलास उजाडे, सुनंदा गोविंदा भुसारी यांची अविरोध निवड झाली आहे.
सिंदखेड ग्रामपंचायत निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 5:30 AM