लोणार(जि. बुलडाणा), दि. २२ : तालुक्यातील वेणी येथील तंटामुक्त अध्यक्षपदासाठी आठ वर्षांनंतर प्रथमच गुप्त मतदान घेण्याची मागणी नवयुवकासह गावकर्यांनी केली आहे.सर्व गावकर्यांच्या संमतीने तंटामुक्त समिती अध्यक्षाची निवड करावी, असा कायदा आहे; मात्र सर्वानुमते निवड करण्याऐवजी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठीच तंटा होण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांच्या या भुमिकेमुळे नऊ वर्षांपासून तंटामुक्ती अध्यक्ष असलेले मनोज तांबिले यांच्यासमोर आव्हान उभे राहिले आहे. तंटामुक्ती अध्यक्ष पदावर गेली नऊ वर्षे मनोज तांबिले अविरोध निवडून येत आहेत; परंतु नऊ वर्षांनंतर प्रथमच वेणी गावच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी गुप्त मतदान घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली असून, त्याप्रमाणे दहा उमेदवारांनी अर्जदेखील दाखल केले आहेत. यामध्ये अनिता संतोष खोतकर, नम्रता प्रताप देशमुख, नारायण देशमुख, विठ्ठल साखरे, प्रल्हाद इंगळे, मनोज तांबिले, प्रवीण देशमुख, श्रीराम ढगे, उत्तम मोरे, डॉ. रामकिसन बागल यांच्या अर्जाचा समावेश आहे. तंटामुक्ती अध्यक्षपदासाठी १४ ऑगस्ट रोजी सरपंच अभिमन्यू साखरे, पोलीस पाटील राजू शेवाळे, सचिव सतीश अंभोरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली; परंतु गुप्त मतदानाच्या मागणीमुळे ही बैठक तहकूब करण्यात आली. २४ ऑगस्ट रोजी गुप्त मतदान पद्धतीने अध्यक्ष निवडीसाठी बैठक घेण्यात येणार आहे.
तंटामुक्ती अध्यक्षपद निवडीसाठी तंटा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2016 1:46 AM