--व्यापारी बँकांना ९०४ कोटींचे उद्दिष्ट--
जिल्ह्यातील व्यापारी बँकांना खरिपाच्या १,३०० कोटी रुपयांपैकी ९०४ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करावे लागणार आहे. एकूण खरिपाच्या उद्दिष्टाच्या ७० टक्के पीक कर्जाचा वाटा हा व्यापारी बँकांना उचलावा लागेल. ९७ हजार ६५० शेतकऱ्यांना या बँकांकडून कर्ज मिळेल. जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती अद्याप अपेक्षितपणे सुधारलेली नसल्याने पीक कर्जाचा बहुतांश हिस्सा हा व्यापारी बँकांना उचलणे क्रमप्राप्त आहे.
--४,३५० शेतकऱ्यांना खासगी बँकांकडून मिळेल कर्ज--
जिल्ह्यातील खासगी बँकांना ४,३५० शेतकऱ्यांना ८२ कोटी रुपयांचे पीक कर्ज द्यावे लागणार आहे. तर जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला १३ हजार शेतकऱ्यांना ६६ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करावे लागले. ग्रामीण बँकेला २४८ कोटी रुपयांचे पीक कर्ज २५ हजार शेतकऱ्यांना वाटप करण्याचे उद्दिष्ट यावर्षीच्या पत आराखड्यांतर्गत देण्यात आले आहे.
--गतवर्षीच्या साध्यावर उद्दिष्ट--
राज्यस्तरीय बँकर्स समितीने यंदा गेल्यावर्षी बँकांनी दिलेल्या उद्दिष्टांच्या साध्याच्या आधारावर बँकांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिलेले आहे. गेल्यावर्षी बुलडाणा जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांतील महत्तम असे १,२४० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केल्या गेले होते. त्याचा आधार घेत जिल्ह्याचे यंदाचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असल्याचे जिल्हा अग्रणी बँकेच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.