लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना संसर्गाची वाढती व्याप्ती पाहता जिल्हास्तरावर आणि राज्यस्तरावर कोरोना रुग्णांच्या उपचार पद्धतीतील समन्वय, गंभीर तथा अती गंभीर रुग्णांच्या बाबतीत रुग्ण व्यवस्थापन संहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोणातून हा टास्क फोर्स गठीत करण्यात आला आहे.कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना व रुग्णावरील उपचारामध्ये सुसुत्रता आणण्याला यात प्राधान्य देण्यात येणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पी.बी.पंडीत यांच्या अध्यक्षतेखाली हा टास्क फोर्स गठीत करण्यात आला असून त्यात एकूण सात सदस्यांचा समावेश आहे. समितीमध्ये सदस्य म्हणून डॉ. सचिन वासेकर (मेडीसीन), बधीरीकरण तज्ज्ञ म्हणून डॉ. राजेश उंबरकर, छाती व क्षयरोगशास्त्र तज्ज्ञ डॉ. मोहम्मद असलम, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र तज्ज्ञ डॉ. प्रशांत बढे आणि वैद्यकीय अधीक्षक असलेले राजेंद्र गायके यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. सुक्ष्मजीवशास्त्र तज्ज्ञाची या सात सदस्यीय समितीमधील जागा रिक्त असून हा तज्ज्ञ उपलब्ध झाल्यानंतरच ही जागा भरल्या जाणार आहे. प्रामुख्याने बुलडाणा जिल्ह्यातील कोवीड केअर सेंटर, हेल्थ सेंटर व डेडीकेटेड हॉस्पीटलमध्ये कोवीड रुग्णांना रुग्ण व्यवस्थापन संहितेनुसार औषधोपचार, योग्य सुविधा तथा रुग्णालयामध्ये विशेषज्ञ डॉक्टर, पॅरामेडीकल स्टॉप उपलब्ध करणे महत्त्वाचे आहे.त्यादृष्टीने ही यंत्रणा कार्यान्वीत राहणार असून राज्य तथा जिल्हास्तरावरील कोवीड रुग्णावर होणाऱ्या उपचार पद्धतीमध्ये समन्वय तथा समानता राखण्याच्या प्रमुख गोष्टीवर जोर दिला जाणार आहे. राज्यस्तरावर वेळोवळी उपचार पद्धतीमध्ये झालेले बदल, त्याबाबत आलेल्या सुचना याची जिल्हास्तरावरील डॉक्टरांना माहिती देण्यासाठी‘मॅकेनीझम’ विकसीत करण्याच्या दृष्टीकोणातून जिल्हास्तरावर ही समिती खासकरून काम करणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.दर सोमवारी या समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेणे क्रमप्राप्त राहणार आहे.
अर्ध्यातासात मिळेल माहितीरॅपीड टेस्ट किट जिल्ह्यास उपलब्ध झालेल्या असून कोरोना संसर्गाच्या दृष्टीने संवेदनशील झालेल्या पॉकेटमध्ये प्रामुख्याने या किटचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. अर्ध्यातासात तपासणी करण्यात आलेल्या व्यक्तीस कोरोना संसर्गाच्या धोक्याची शक्यता कितपत आहे याचे आकलन यामाध्यमातून होणार आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवरील विलंब तथा त्वरित कोरोना संदिग्ध रुग्ण शोधणे सोपे होणार आहे. जिल्ह्यास दोन हजार रॅपीड टेस्ट किट उपलब्ध झाल्या असून लवकरच त्यांचा वापर सुरू होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.