बुलडाणा : जिल्हाभरात आता क्षेत्रफळाऐवजी ग्रामपंचायत क्षेत्रातील भांडवली मूल्यावर कर आकारणी होणार आहे. राज्य शासनाने ग्रामपंचायत कर व शुल्क नियम १९६0 यात आणखी सुधारणा केल्यामुळे या कर आकारणीची प्रक्रिया १ एप्रिल २0१६ पूर्वी करावी लागणार आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीला कर निर्धारित करून त्यावर आक्षेप, हरकती घेऊन तो अंतिम करण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्यामुळे मार्च २0१६ पर्यंत नवीन कर आकारणी लागू होण्याची शक्यता आता मावळली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दोन वर्षांची घरपट्टी सन २0१६-१७ या आर्थिक वर्षात भरावी लागणार आहे. मागील नऊ महिन्यांपासून ग्रामीण भागातील घरपट्टी वसुली बंद होती. त्यानंतर राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने ३१ डिसेंबर रोजी कर आकारणीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे क्षेत्रफळाऐवजी आता भांडवली मूल्यावर आधारित कर आकारणी करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार ही कर आकारणी प्रक्रिया १ एप्रिल २0१६ पूर्वी करावी लागणार आहे.
पुन्हा तीन महिने रखडणार कर आकारणी!
By admin | Published: January 25, 2016 2:23 AM