लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाच्या शिक्षण विरोधी धोरणामुळे शिक्षक व संस्थाचालकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून, याविरूद्ध लढा उभारला जात आहे. ३० जानेवारी रोजी अमरावती येथे आंदोलन केले जाणार असून, पूर्वतयारी म्हणून विज्युक्टाच्यावतीने वाशिम येथे २८ जानेवारी रोजी बैठक घेतली.१ नोव्हेंबर २००५ पूर्वी व नंतर नियुक्त सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, कायम विनाअनुदानित तत्त्वावरील मूल्यांकनात पात्र कनिष्ठ महाविद्यालयाची यादी घोषित करून त्यांना त्वरित प्रचलित सूत्राने अनुदान द्यावे, २४ वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना विनाअट निवड श्रेणी देण्यात यावी, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष करण्यात यावे, सन २०११-१२ पासूनच्या वाढीव पदांना मंजुरी द्यावी, केंद्राप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना वेतन आयोगाचे सूत्र लागू करावे, वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीसाठी कॅशलेस प्रणाली तातडीने सुरू करावी, शालार्थ प्रणालीमध्ये नावे समाविष्ट करून तातडीने वेतन सुरु करावे, संचमान्यतेतील त्रुटी दूर करून विद्यार्थी संख्या अट शिथिल करावी, शिक्षकांच्या पाल्यांचे सर्व शिक्षण मोफत द्यावे यासह विविध मागण्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विज्युक्टा संघटनेने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. ३० जानेवारी रोजी अमरावती येथे आंदोलन केले जाणार असून, २८ जानेवारी रोजी वाशिम येथे पार पडलेल्या बैठकीत या आंदोलनाची माहिती देण्यात आली. अमरावती येथील आंदोलनात वाशिम जिल्ह्यातील शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, अशी माहिती विज्युक्टा जिल्हाध्यक्ष प्रा. अनिल काळे यांनी दिली. बैठकीला प्रा. सतीष चैतवार, डॉ. के. बी. देशमुख, प्रा. विद्यासागर खराटे, प्रा. रामराव वानखेडे, प्रा. एस.डी. जाधव, प्रा. वामन खंडारे, प्रा. सुनील जगताप, प्रा. संजय खिराडे, डॉ.पी बी मोरे, प्रा. वसंतराव देशमुख, प्रा. संजय हंडे, प्रा. जयसिंग खचकड, प्रा. शिरीष माळोदे, प्रा. प्रकाश बोबडे, प्रा. राजा वामन, प्रा. प्रदीप सांगळे, प्रा. प्रमोद अवताडे, प्रा हरीषसिंग रघुवंशी, प्रा. अभिजित कदम, प्रा. बाळकृष्ण खाडे आदींची उपस्थिती होती.
प्रलंबित मागण्यांवरून शिक्षक आक्रमक; ३० जानेवारीला अमरावती येथे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 4:36 PM