बुलडाणा : जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी शिक्षकदिनी ह्यशिक्षक पुरस्कारांचे वितरणह्ण केल्या जाते. यावर्षीसुद्धा या पुरस्कार सोहळ्याचे जिल्हा परिषदेने आयोजन केले होते; मात्र कार्यक्रम सुरू होण्याच्या क्षणापर्यंंत आयुक्त कार्यालयातून शिक्षक पुरस्कारांच्या प्रस्तावांना मान्यता मिळाली नाही. त्यामुळे शिक्षक पुरस्कारांच्या वितरणाविनाच शिक्षकदिन पार पडला. विशेष म्हणजे अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांपैकी केवळ यवतमाळ जिल्ह्याच्याच पुरस्कार प्रस्तावांना आयुक्त कार्यालयातून मान्यता मिळाल्याची माहिती आहे. शिक्षकदिनी दिल्या जाणार्या शिक्षक पुरस्कारांचे प्रस्ताव तालुका स्तरावर व तालुकास्तरावरून जिल्हा स्तरावर मान्यतेसाठी येतात. जिल्हा परिषदेत मु ख्य कार्यपालन अधिकारी, शिक्षणाधिकारी व शिक्षण सभापतींच्या नेतृत्वात असलेल्या समितीमध्ये या पुरस्कार प्रस्तावांची छानणी केली जाते. प्रस्तावात नमूद केलेल्या मुद्यांची तपासणी करून नंतर हा प्रस्ताव पुरस्काराच्या अंतिम मान्यतेसाठी आयुक्त कार्यालयात पाठविला जातो. यावर्षी बुलडाणा जिल्ह्या तून ११ शिक्षकांचे प्रस्ताव आयुक्त कार्यालयात पाठविण्यात आले होते; मात्र या प्रस्तावांच्या मूळ प्रती आयुक्त कार्यालयात पाठविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे आयुक्तांनी या प्रस्तावांना मान्यता दिली नाही. सोबतच प्रस्तावाच्या प्रक्रियेमध्ये चार त्रुटी आढळून आल्याने तशी सूचना आयुक्त कार्यालयाने शिक्षण विभागाला केली. या त्रुटींची पूर्तता न झाल्यामुळे शिक्षकदिनापर्यंंत शिक्षक पुरस्कारांना मान्यता मिळू शकली नाही. बुलडाणा जिल्ह्यात १३ तालुके असून, यावर्षी प्रत्येक तालुक्यातून किमान एक शिक्षकही जिल्हा परिषदेला या पुरस्कारासाठी मिळाला नाही. केवळ अकराच प्रस्ताव पाठविले असून, तेही आता प्रलंबित आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाने घोषित केलेल्या पुरस्कारामध्येही यावर्षी बुलडाण्याचा समावेश नव्हता. शिक्षक पुरस्कारांच्या प्रस्तावाबाबत आयुक्त कार्यालयातून काही त्रुटींची पूर्तता करण्याची सूचना मिळाली आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू असून, शिक्षक पुरस्काराच्या मान्यतेची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल असे शिक्षणाधिकारी (प्राथ.) वैशाली ठग यांनी कळवले.
शिक्षक पुरस्कार प्रस्तावांना वेळेत मान्यता नाही
By admin | Published: September 07, 2014 12:38 AM