लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे पडघम पुन्हा वाजू लागले असून कोरोना संसर्गामुळे जुलै महिन्यात होवू न शकलेली ही निवडणूक आता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता प्रशासकीय वर्तुळात चर्चिल्या जात आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात या निवडणुकीसाठी एकूण १४ मतदान केंद्र प्रस्तावीत करण्यात आली आहेत.दरम्यान ३० डिसेंबर २०१९ रोजी या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केली होती. सोबतच सततच्या पुनर्निरिक्षण कार्यक्रमातंर्गत पात्र मतदारांच्या यादीत नावाची नोंदणी मतदारांना करता येणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील १३ ही तालुक्याच्या ठिकाणी १३ मतदान केंद्र व बिहारच्या धर्तीवर ज्य मतदान केंद्रावर एक हजार पेक्षा अधिक मतदार आहे अशा ठिकाणी एक सहाय्यकारी मतदान केंद्र म्हणून बुलडाण्यात १४ वे मतदान केंद्र राहणार आहे.बुलडाणा येथे १,१४३ मतदार असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडे त्यासंदर्भाने शिफारस करण्यात आली आहे. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील १४ ही प्रस्तावीत मतदान केंद्रांना मान्यतेसाठीचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगामार्फ त केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला आहे. दुसरीकडे ३० डिसेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीनुसार बुलडाणा जिल्ह्यात ७,२१९ मतदार असून जळगाव जामोद येथे ३४३, संग्रामपूर येथे २०५, मलकापूर ५९०, नांदुरा ३८५, मोताला २७०, शेगाव ५२५, खामगाव ८७५, चिखली येथे ८७३, बुलडाणा (महसुल विभाग, तहसिल कार्यालय मतदान केंद्र) ५७५ आणि बुलडाणा (संजय गांधी विभाग, तहसिल कार्यालय) येथे ५५५, देऊळगाव राजा ४२७, सिंदखेड राजा ४२०, मेहकर ७७९ आणि लोणार येथील मतदान केंद्रावर ३९७ मतदारांसाठी हे मतदान केंद्र प्रस्तावीत करण्यात आले आहेत.दरम्यान, शिक्षक मतदार संघाच्या यादीमध्ये नाव समाविष्ठ असलेल्या मतदारांच्या पाहणीकरीता प्रारुप मतदान केंद्राची यादी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागात कार्यालयीन वेळेत उपलब्ध असल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान, शिक्षक संघटनांच्यावतीने आता राजकीय हालचालींना वेग देण्यात आला आहे. संघटनात्मक पातळीवरही आता मोर्चे बांधणीस प्रारंभ झाला आहे.
शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे पडघम; नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये निवडणूक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 12:17 PM