- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पुस्तक आणि गणवेश वेळेवर मिळत नसल्याने शिक्षकांना दरवर्षी पालकांचे दोन शब्द शाळा सुरू होताच ऐकावे लागतात. मात्र यंदा गणवेश जरी वेळेवर मिळाले नसले; तरी पाठ्यपुस्तकांचे वाटप वेळेवर करण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे. जिल्ह्यातील २ हजार ६७ शाळांमधील २ लाख ८८ हजार ४४८ विद्यार्थ्यांच्या हातात शाळा सुरू होताच नवीन पुस्तके आली आहेत. त्यामुळे पुस्तकांच्या नियोजनावर गुरूजी खूश व विद्यार्थी आनंदीत झाल्याचे चित्र सध्या जिल्ह्यातील शाळांमध्ये दिसून येत आहे.शिक्षण हक्क कायद्यानुसार शासनाच्यावतीने जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश व मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. शिक्षण विभागाच्यावतीने जिल्हा परिषद जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार त्यांच्या गणवेशसाठी लागणारा निधी देण्यात येतो. विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार नवीन पाठ्यपुस्तकांचे संचही शाळा सुरू होण्यापूर्वी शाळेमध्ये पोहचविले जातात. मात्र जिल्ह्यात शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश विद्यार्थ्यांना मिळत नसल्याचे चित्र दरवर्षी पाहावयास मिळते. मागील वर्षी काही ठिकाणी तर शाळा सुरू होऊन महिना उलटत असतानाही गणवेश किंवा पुस्तके मिळाले नसल्याचे उदाहरण जिल्ह्यात समोर आले आहेत. त्यामुळे गणवेश व पाठ्यपुस्तकांविषयी शिक्षकांना प्रत्येक वेळी पालकांना तोंड देतादेता ‘नाकी नऊ’ येतात. परंतू यंदा जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पुस्तक वाटपाचे नियोजन शाळा सुरू होण्याच्या महिनाभर अगोदर केल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर पुस्तके मिळू शकली. शासनाच्या समग्र शिक्षा अंतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगर पालिका व इतर शाळा अशा एकूण २ हजार ६७ शाळांमध्ये वेळेवर पाठ्यपुस्तके पोहचविण्यात आली. दरम्यान शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवसापासून आतापर्यंत पहिली ते आठवीपर्यंतच्या २ लाख ८८ हजार ४४८ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. २६ जून रोजी शाळा सुरू झाल्या असून शाळेच्या पहिल्याच दिवशी बहुतांश शाळेतील विद्यार्थ्यांच्या हातात नवीन पुस्तके पडली.सहावी ते आठवीपर्यंत १ लाख १५ हजार विद्यार्थीइयत्ता सहावी ते आठवीपर्यंतच्या १ लाख १५ हजार ३५१ विद्यार्थ्यांना शासनाच्या समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले आहेत. आतापर्यंत १०० टक्के पाठ्यपुस्तकांचे वितरण झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी संख्या ही बुलडाणा तालुक्यात आहे. बुलडाणा तालुक्यात सहावी ते आठवीपर्यंतचे सुमारे १३ हजार १९१ विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात आली आहेत.पहिली ते पाचवी पर्यंत एक लाख ७३ हजार विद्यार्थीजिल्ह्यात इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या १ लाख ७३ हजार ९७ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ देण्यात आला. त्यात इयत्ता दुसरीचा अभ्यासक्रम बदलला असून त्यांना नवीन अभ्यासक्रमांचे पुस्तके देण्यात आली आहेत.
पुस्तकांच्या नियोजनावर गुरूजी खूश; विद्यार्थी आनंदीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 2:05 PM