लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यातील खासगी शैक्षणिक संस्थांवरील शिक्षकांना नव्या शैक्षणिक सत्रासाठी विद्यार्थी मिळविण्याचे संस्थाचालकांकडून टार्गेट देण्यात आले आहे. त्यामुळे नोकरी वाचविण्यासाठी शिक्षकांची धडपड सुरू असून, विद्यार्थी प्रवेशाकरिता शिक्षक दारोदारी जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात कॉन्व्हेंट, सीबीएससी संस्था मोठ्या प्रमाणावर वाटल्याने विद्यार्थी संख्येचा प्रश्न बिकट झाला आहे. जिल्ह्यात शाळा जास्त व विद्यार्थी कमी असे उलट चित्र पाहावयास मिळत आहे. शाळेतील विद्यार्थी संख्या टिकविण्याकरिता संस्थेकडून विविध फंडे वापरण्यात येत आहेत. आता २६ जून रोजीपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत असून, या सत्रामध्ये नवीन विद्यार्थी मिळविण्याचे टार्गेट संस्थाचालकांनी शिक्षकांना दिले आहेत. त्यामुळे शिक्षकांची सध्या शहरी भागासह ग्रामीण भागात विद्यार्थी शोध मोहीम सुरू आहे. शिक्षकांसमोर सध्या नोकरी वाचविण्यासाठी ‘मिशन अॅडमिशन’ हे धोरण संस्थाचालकांनी ठेवलेले आहे. त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या दारोदारी जाऊन पालकांची मनधरणी करावी लागत आहे. शाळेतील एका तुकडीत नियमाप्रमाणे पटसंख्या नसल्यास ती तुकडी रद्द होऊन शिक्षकसुद्धा अतिरिक्त ठरतात. त्यामुळे तुकडी व नोकरी वाचविण्याकरिता शिक्षकांना विद्यार्थी संख्येचा भरणा करण्याशिवाय पर्याय नाही. यामध्ये अनुदानित शाळांसह विना अनुदानित शाळांचाही शिक्षकांचा समावेश असून, अनुदानित शाळेतील शिक्षक हे नोकरी जाऊ नये म्हणून तर विनाअनुदानित शाळेतील शिक्षक हे नोकरीसह शाळा अनुदानास पात्र या आशेवर विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी भटकंती करत आहेत. सध्या कॉन्व्हेंट व सीबीएससी पॅटर्नमुळे खासगी शाळांमध्ये विद्यार्थी मिळविण्याची स्पर्धा सुरू आहे. अनेक शाळांमधील शिक्षक हे विद्यार्थी व त्यांच्या पालकांना गणवेश, पुस्तके, वाहन व्यवस्था अशी आमिषे दाखवून आमच्याच शाळेत पाल्याचे नाव टाका, अशी विनवणी करीत आहेत. संस्थाचालकांकडून वारंवार सूचना होत असल्याने शिक्षकांना विद्यार्थी मिळविण्याशिवाय पर्याय राहिला नाही.शिक्षकांवर संस्थाचालकांचे दडपणजिल्ह्यात खासगी संस्थांचे प्रमाण वाढले आहे. शाळा अनुदानास पात्र ठरावी यासाठी विद्यार्थीसंख्याही आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थी मिळविण्यासाठी संस्थाचालकांचे शिक्षकांवर दडपण वाढले आहे. तेव्हा सुटीच्या दिवसातही भर उन्हात शिक्षकांना ग्रामीण भागात पाठवले जात आहे. मिशन अॅडमिशन डोळ्यासमोर ठेवून काही शाळांनी स्कूल बसच गावोगावी पाठविल्या जात आहेत.शिक्षकांची भर उन्हात विद्यार्थी शोध परीक्षाआपल्या शाळेतील तुकड्या वाचविण्यासाठी शिक्षकांना भर उन्हात फिरावे लागत आहे. शाळा सुरू होण्यासाठी एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी शिल्लक असताना बहुतांश खासगी प्राथमिक व माध्यमिक तर काही ठिकाणी उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांचा विद्यार्थी मिळविण्यासाठी आटापिटा सुरू असून, शिक्षकांची भर उन्हात विद्यार्थी शोध परीक्षाच सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शिक्षकांना विद्यार्थी मिळविण्याचे ‘टार्गेट’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2017 12:32 AM