बुलडाणा : राज्यभरात वाढत असलेल्या काेराेना संसर्गाला राेखण्यासाठी १४ एप्रिलच्या सायंकाळपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ३० एप्रिलपर्यंत राज्यभरातील शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला हाेता. तसेच ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य केली हाेती़. मात्र, काेराेना रुग्णांची वाढती संख्या पाहता शिक्षकांना शाळेत न येण्याचे आदेश १५ एप्रिल राेजी देण्यात आले आहेत.
कोरोनाची संक्रमण साखळी खंडित करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत संचारबंदीसह जमावबंदीदेखील केली आहे. त्या अनुषंगाने राज्य शासन व जिल्हाधिकारी आदेशान्वये बुलडाणा जिल्ह्यातील सर्व खासगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील शिक्षकांना ‘वर्क फ्रॉम होम’चे आदेश दिले आहेत.
संचारबंदीच्या अनुषंगाने सर्व खासगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, परंतु जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांना ५० टक्के उपस्थितीचे आदेश १५ एप्रिल रोजी निर्गमित करण्यात आलेल्या पत्राद्वारे देण्यात आले हाेते. हे आदेश रद्द करून जिल्हा परिषद शिक्षकांना संचारबंदीच्या काळात शाळेत उपस्थित राहण्याची गरज नसल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांच्या व्यवस्थापनांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. यादरम्यान ऑनलाइन पद्धतीने अध्यापन, स्वाध्याय उपक्रम, तसेच सुधारित निकषानुसार मूल्यमापन प्रक्रिया वर्क फाॅर्म हाेम पद्धतीने पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेशित केल्यानुसार अत्यावश्यक सेवेमध्ये काम करावे लागणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.