फहीम देशमुख। लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : शहरामध्ये शंभर टक्के शौचालयांची उभारणी व वापर करणाऱ्या शहराला राज्याचा नगर विकास खात्यामार्फत चार कोटी रुपयांचा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार मिळविण्यासाठी प्रयत्न करणऱ्या नगरपालिकांची तपासणी ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियाना’ची चमू करीत असते. ही चमू शनिवारी शेगावात दाखल होत असून, या चमूला सर्व काही स्वच्छ दिसावे म्हणून नगरपालिकेच्या १०० शिक्षकांना हगणदरीमध्ये कुणीही उघड्यावर शौचास जाणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.राज्याच्या नगर विकास खात्यामार्फत शहर हगणदरीमुक्त करण्यासाठी पुरस्कार जाहीर केलेला आहे. शहरातील नागरिकांच्या गरजा, पालिकेकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा यांचा सविस्तर आढावा घेऊन हा पुरस्कार देण्यात येतो. या अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत हगणदरीमुक्त होणाऱ्या शहरांची तपासणी करण्यासाठी राज्यस्तरीय समितीचे गठण करण्यात आले आहे. शहरे हगणदरीमुक्त करण्यासाठी ज्या कुटुंबाकडे शौचालय नाहीत, ते उघड्यावर शौचास जातात, अशा कुटुंबांना वैयक्तिक घरगुती शौचालय अथवा सामुदायिक शौचालयांची सुविधा द्यायची होती. शेगाव नगरपालिकेने या संदर्भात पूर्ण क्षमतेने प्रयत्न केले असून, त्याबाबतची तपासणी करण्यासाठी गठित करण्यात आलेली समिती शनिवारी शेगाव शहरात येणार आहे. त्यासाठी शेगाव नगरपालिकेने शेगाव शहराच्या आत भर वस्तीमध्ये ८ ठिकाणी हगणदरी निर्माण झालेली आहे. या सर्व ठिकाणी सकाळी ४ वाजेपासून ८ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ७ वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत अनेक नागरिक उघड्यावर शौचास बसतात. नगरपालिकेने मागील महिनाभरात उघड्यावर शौचास बसणाऱ्या अशा २०० च्यावर नागरिकांवर कारवाई करून शहरात हगणदरी अस्तित्वात असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळेच आता तपासणी चमू येत आहे म्हणून अस्वच्छ भागाला आठवडाभरापासून स्वच्छ ठेवले जात आहे. उघड्यावर आठवडाभर शौचास बसू नये म्हणून अशा हगणदरीमध्ये एका-एका जागी ६ ते ८ जणांना नियुक्त केले आहे. यामध्ये शिक्षकांचाही समावेश आहे. सकाळची शाळा संपली की प्रत्येक शिक्षकांना चमूसोबत अशा हगणदरीमध्ये ड्युटी करावी लागत आहे. विशेष म्हणजे नगरपालिकेचे मुख्याधिकारी अतुल पंत यांनी ११ जुलै रोजी शहरातील हगणदरीमुक्तीसाठी एका पथकाची नियुक्ती केली असून, यात नगरपालिकेचे कर्मचारी, बचत गट प्रतिनिधी यांचा समावेश होता. त्यामध्ये आता शिक्षकांचाही समावेश करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शिक्षक त्रस्त झाले आहेत. मुख्याध्यापक वगळता नगरपालिकांमधील उर्दू आणि मराठीचे १०० च्यावर शिक्षकांचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे महिला शिक्षकांचाही समावेश आहे.समिती करणार या मुद्यांची तपासणी शहरातील सर्व कुटुंबांना शौचालयाची सुविधा उपलब्ध आहे किंवा नाही, याची पाहणी महत्त्वाची आहे. शहरातील तरंगती लोकसंख्या लक्षात घेता, शेगाव शहरात आवश्यक अशा ठिकाणी सार्वजनिक शौचालये पुरेशा प्रमाणात आहे का, तसेच त्याचा वापर होतो का, याची पाहणी ही समिती करणार आहे. शंभर टक्के स्वच्छतागृह उभारल्याने पालिकेला या पुरस्कारासाठी अपेक्षित गुणांची टक्केवारी, शहरातील पाणीपट्टी तसेच घरपट्टी वसुलीही, पालिकेकडून होणारी सर्व विकास कामे ई-टेंडरिंगची कामे, दिव्यांगांसाठीच्या तीन टक्के निधीपैकी किती निधी खर्च झाला, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतील २०१५-१६ वर्षाच्या निधीतील किती निधी खर्च झाला, यासाठीही पालिकेला गुण देण्यात येणार आहे. शहरातील वृक्ष लागवडीसाठी झालेल्या प्रयत्नांचा विचार पुरस्कारामध्ये करण्यात येणार आहे. उल्लेखनीय म्हणजे या समितीने शहरातील अशा भागाला पहाटेच्या आणि रात्रीच्या सुमारास भेट देऊन पाहणी करणे आवश्यक आहे; मात्र ही समिती कधी पोहोचणार, याची माहिती नाही....प्रत्यक्षात बकाल अवस्था!आपला परिसर स्वच्छ ठेवणे हे शहरातील प्रत्येक नागरिकाचे काम आहे; मात्र तसे होत नाही. यामुळे शेगाव शहराची सध्या बकाल अवस्था झालेली आहे. अनेक गल्लीबोळात कचऱ्याचे ढीग कायम आहेत. नाल्या भरलेल्या आहेत. न.प. ने ज्या कंत्राटदाराला शहरातील कचरा गोळा करण्याचा कंत्राट दिला, त्या कंत्राटदाराची वाहनेच मुख्य रस्त्यांवर कचरा पसरवतात. याकडे नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे साफ दुर्लक्ष आहे. जी वाहने व्यावसायिकांकडून कचरा गोळा करतात, त्या वाहनांमध्ये कचऱ्यावर कापड टाकण्यात येत नसल्याने त्यातील काचरा हा संपूर्ण रस्त्यावर पसरतो.
शिक्षकांची ‘ड्युटी’ हगणदरीत!
By admin | Published: July 15, 2017 12:41 AM