बुलडाणा: शासनाच्या शैक्षणिक विभागातर्फे शिक्षकांच्या ऑनलाइन समायोजन प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अनेक अ ितरिक्त शिक्षकांना काम मिळणार असून, रिक्त जागा असलेल्या शाळेचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबणार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या ऑनलाइन समायोजन प्रक्रिया योग्य आहे, असा सूर ‘शिक्षकांची ऑनलाइन समायोजन प्रक्रिया योग्य आहे की अयोग्य?’ या विषयावर बुधवारी आयोजित परिचर्चेत उमटला. देशाची डिजिटल इंडियाकडे वाटचाल सुरू असून, सर्वच कामे ऑनलाइन होत आहेत. त्यात शिक्षक विभाग मागे नाही. सध्या शिक्षकांची ऑनलाइन समायोजन प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत अतिरिक्त शिक्षकाची माहिती टाकण्यात येत असून, रिक्त असलेल्या शाळेतील पदे समायोजनाद्वारे भरण्यात येत आहे. या प्रक्रियेत अतिरिक्त शिक्षकाला तालुक्यातील २0 गावांपैकी एक गावातील रिक्त असलेल्या शाळेवर नियुक्ती मिळणार आहे. या प्रक्रियेमुळे अतिरिक्त शिक्षकाला काम मिळणार असून, रिक्त जागा असलेल्या शाळेचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे; मात्र या प्रक्रियेत खासगी संस्थेचे काही प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे ऑनलाइन प्रक्रिया चांगली असली त्याच्या नियमात बदल करणे आवश्यक असल्याचे सहभागी मान्यवरांनी सांगितले.
शिक्षक समायोजनची ऑनलाइन प्रक्रिया अयोग्य असून, त्यामुळे अनेक चांगल्या शिक्षकांवर अन्याय होणार आहे. यापूर्वी समु पदेशन करून शिक्षकांच्या बदल्या करण्यात येत होत्या. त्यात बदलीपात्र शिक्षकाला तालुक्यातील ५0 गावांपैकी एका गावाची निवड करण्याची संधी मिळत होती; मात्र ऑनलाइन प्रक्रियेत तालुक्यातील फक्त २0 गावांपैकी एक गाव निवड करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकाला योग्य गावाची निवड करण्याची संधी मिळेल किंवा नाही, हे सांगत येत नाही. त्यामुळे सदर पद्धत चुकीची आहे. - रवींद्र नादरकर, शिक्षक, चिखली.
शिक्षण विभागातर्फे शिक्षकांच्या बदलीसंदर्भात ऑनलाइन समायोजन करण्यात येत आहे. सदर पद्धत योग्य असून, त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळेत अतिरिक्त शिक्षक असताना राजकीय हस्तक्षेपामुळे शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येत नाही. त्यामुळे ऑनलाइन समायोजन प्रक्रिया चांगली असून, भ्रष्टाचार व चिरिमिरीला आळा बसणार आहे. ज्या संस्था ऑनलाइन प्रक्रियेतून आलेल्या शिक्षकाला रुजू करून घेणार नाहीत, त्या संस्थेचे अनुदान प्रक्रिया थांबणार आहे, त्यामुळे हा निर्णय चांगला आहे.- डी. डी.वायाळ, शिक्षक, बुलडाणा.
शिक्षकांची ऑनलाइन समायोजन प्रक्रिया योग्य आहे; परंतु शिक्षक समायोजनासंदर्भात खाजगी संस्थेचे अधिकार काढण्यात आल्यामुळे शाळेचे व संस्थेचे काही नुकसान होण्याची शक्यता आहे. खासगी संस्थेतील अतिरिक्त ठरलेला शिक्षक कनिष्ठ शिक्षक असतो. त्याचे समायोजन केल्यानंतर रिक्त जागा असलेल्या संस्थेला चांगला शिक्षक हवा असल्यास तसेच समायोजनानुसार येणारा शिक्षक अनुभवाने कमी असल्यास त्या संस्थेचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे रिक्त जागा असलेल्या संस्थेत समायोजनेनुसार शिक्षक द्यावा; मात्र त्याची मुलाखत घेण्याचे अधिकार संस्थेला देणे आवश्यक आहे. -सुनील जवंजाळ, प्राचार्य तथा अभ्यास मंडळ सदस्य, कोलवड, बुलडाणा.
शिक्षण विभागातर्फे सुरू असलेली शिक्षक समायोजन प्रक्रिया योग्यच आहे. अनेक शाळेत अतिरिक्त झालेल्या शिक्षकांना विना कामाचे वेतन देण्यात येत होते. तर अनेक शाळेत रिक्त असलेल्या जागेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते; मात्र ऑनलाइन समायोजन योजनेमुळे बिंदू नामावलीनुसार रिक्त पदावर विषयनिहाय नियुक्ती मिळत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबणार आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांना काम मिळून शासनाचे होणारे नुकसान टळणार असून, रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. - रामेश्वर तायडे, मुख्याध्यापक, शरद पवार हायस्कूल, भडगाव ता. बुलडाणा
जिल्ह्यातील अनेक खासगी संस्थेत शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठय़ा प्रमाणात शैक्षणिक नुकसान होते; मात्र शिक्षकांच्या ऑनलाइन समायोजन योजनेमुळे खासगी संस्थेत जागा भरल्या जाणार असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे; मात्र या प्रक्रियेमुळे खासगी संस्थेचे काही प्रमाणात नुकसान होणार आहे. संस्थेला आवश्यक असलेला उमेदवार ऑनलाइन प्रक्रियेनुसार येणार असल्यामुळे संस्थेला कशा प्रकारचा उमेदवार हवा, याबाबत निवड करण्याचे अधिकार नसल्यामुळे संस्थेचे नुकसान होणार आहे. - बाळ अयाचित, शिक्षक, बुलडाणा.