शेगांव : निवडणूक व जनगणना या दोन कामाव्यतिरीक्त अन्य कोणतेही अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नये असे निर्देश असतांना देखील मतदार यादीचे काम करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षकांना महसूल विभागामार्फत देण्यात आले आहेत. शिक्षकांना मुळ काम सांभाळून या अतिरिक्त कामाचा बोजा सोपवण्यात आल्यामुळे शिक्षकांचा मानसिक ताण वाढलेला आहे. या कामामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामाकडे निश्चित दुर्लक्ष होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सदर काम शिक्षकांना देण्यात येऊ नये यासंदर्भात चर्चा करण्यात आली असुन महसूल विभाग स्तरावरील यंत्रणेमार्फत दरवर्षी प्रमाणे सदर मतदार यादीचे काम करण्याच्या मागणीचे निवेदन शिक्षक सेनेच्या वतीने ३० आॅगष्ट रोजी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी डॉ.सागर भागवत यांना तालुका अध्यक्ष सुनिल घावट यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा कार्यकारिणी सदस्य मो.सलिम, तालुका सरचिटणीस धम्मपाल आंग्रे, उपाध्यक्ष प्रमोद इंगळे, संजय इंगळे, अमृतराव वानरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नये - शिक्षक सेनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 1:02 PM