बुलडाणा : जिल्हाभरात शाळा भेटीच्या माध्यमातून शाळांची पाहणी केली असता अनेक ठिकाणी भाषा आणि गणिताच्या संदर्भात चांगली प्रगती असल्याचे दिसून आले. इयत्ता पहिली व दुसरीची गुणवत्ता खूप चांगली आहे; मात्र इयत्ता ५ वी ते ८ वी चे विद्यार्थ्यांना अजून कौशल्य प्राप्तीसाठी शिक्षकांनी मेहनत घेणे आवश्यक आहे. राज्यस्तरावरून गुणवत्तेच्या संदर्भात शिक्षकांवर जी जबाबदारी सोपविली ती शिक्षकांनी अंगिकारली तर शिक्षक आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढून शाळेच्या गुणवत्तेत फरक दिसेल म्हणून येणार्या काळात शिक्षकांनी पूर्ण क्षमतेने काम करावे आणि गुणवत्तेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ यांनी केले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलडाणाच्यावतीने ११ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. मुधोळ म्हणाल्या की, जिल्ह्याची गुणवत्ता प्रतिवर्षी १0 टक्के वाढवून शाळेचा, केंद्राचा आणि जिल्ह्याचा शैक्षणिक गुणवत्ता विकास करण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील शिक्षक ते शिक्षणाधिकारी या सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. मातृभाषेसोबतच इंग्रजी व हिंदी भाषा विद्यार्थ्यांना अवगत होईल, तिचा व्यवहारात वापर करता येईल, अशा दृष्टीने शिक्षण देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी मंचावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.सुभाष कांबळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग आदी उपस्थित होते.
शिक्षकांनी गुणवत्तेसाठी पुढाकार घ्यावा
By admin | Published: August 11, 2015 11:29 PM