बुलढाणा : अशैक्षणिक कामांच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षकांनीशिक्षक दिनी काळ्या फिती लावून काम केले. या अनोख्या आंदोलनात जिल्ह्यातील जवळपास पाच हजारांवर शिक्षकांनी सहभाग घेतला. अशैक्षणिक कामांच्या ओझ्यामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षक हे मेटाकुटीला आलेले आहेत. विद्यार्थ्यांना शिकविण्यापेक्षा शिक्षकांना वर्षभर ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने अशैक्षणिक कामांना शासनाने जुंपलेले आहे. त्यातच मुख्याध्यापक केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांची हजारो पदे मागील दहा ते बारा वर्षांपासून रिक्त आहेत. या रिक्त पदांचा जादा प्रभार शिक्षकांना सांभाळावा लागत आहे. त्यामुळे शिक्षक हे आधीच त्रस्त झाले आहेत.
विद्यार्थ्यांना शिकवायला वेळ कमी मिळतो. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिपाई, लिपिक आणि मुख्याध्यापक यांची सर्व कामे शिक्षकांनाच करावी लागतात. त्यातच मोबाइलच्या माध्यमातून शिक्षकांना वेळी अवेळी कामाचे आणि बिनकामाचे मेसेजेस पाठवून वरिष्ठ अधिकारी त्रस्त करुन सोडत असल्याचा आरोप ही शिक्षक दिनी शिक्षकांनी केला. स्टुडंट पोर्टल, शालेय पोषण आहार, नवभारत निरक्षर सर्वेक्षण, नवीन मतदार नोंदणी या कामांमुळे जि. प. च्या शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. वीसच्या आत पटसंख्या असलेल्या शाळा शासन बंद करण्याचा घाट शासनाने घातला आहे. या सर्व बाबींना कंटाळून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांनी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी काळ्या फिती लावून काम केले. अशैक्षणिक कामांच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्ह्यातील पाच हजार प्राथमिक शिक्षकांनी हे आंदोलन केले आहे.
या आंदोलनाचे आवाहन महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी केलेले होते. त्यानुषंगाने आजचे आंदोलन यशस्वी झालेले आहे. अशैक्षणिक कामांच्या निषेधार्थ जिल्ह्यातील पाच हजारांवर शिक्षकांनी शिक्षक दिनी काळ्या फिती लावून काम केले.-तेजराव देशमुख, जिल्हाध्यक्ष, राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना, बुलढाणा.