लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना विषाणू संसर्गामुळे लॉकडाऊन लागू झाल्यापासून सर्व मंदिर बंद आहेत. मिशन बिगीनचा तिसरा टप्पा आता सुरू झाला आहे. परंतू धार्मिक स्थळे उघडण्याबाबत अद्याप निर्देश दिलेले नाहीत. मंदिर बंदच असल्यामुळे या संकष्ट चतुर्थीला भक्तांना घरातूनच बाप्पाची आराधना करवी लागली. ८ जून रोजी संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर बुलडणा येथील गणेश मंदिराच्या ठिकाणी भक्तांना मंदिराबाहेरूनच दर्शन घेतले.विघ्नहर्ता श्री गणेशाच्या भक्तवर्गाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे संकष्ट चतुर्थीला गणेश मंदिरामध्ये मोठी गर्दी होते. संकष्टी, अंगारकी यासारख्या चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. या दिवशी गणेश मंदिरामध्ये भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर पूजा अर्चा केली जाते. ८ जून रोजी संकष्ट चतुर्थी होती. परंतू कोरोना विषाणू संसर्गामुळे मंदिर बंद असल्याने भाविकांना घरातच गणरायाचे पूजन करावे लागले. मिशन बिगीनचा आता तिसारा टप्पा सुरू झाला असतानाही सध्या मंदिर उघडण्याबाबत कुठल्याच हालचाली दिसून येत नाहीत. शहरातील काही मंदिर सकाळी पूजनासाठी उघडून आरती आटोपून पुन्हा बंद करण्यात आले. चतुर्थीला गणेश मंदिराच्या ठिकाणी यात्रेचे स्वरूप निर्माण होते. परंतू आज दिवसभर भाविकांनी मंदिराच्या बाहेरून दर्शन घेतले. येथील सुवर्ण गणेश मंदिरासमोरच काही भक्तांनी गेटवरच गणरायाचे पूजनही केले.संकष्ट चतुर्थीला कोरोनाचे संकट निवारण्याची प्रार्थना२०२० हे वर्ष संकटे घेऊन आलेले वर्ष म्हटले जाते. संपूर्ण जग कोरोनामुळे भयभीत आहे. संकष्ट चुतर्थीला नेहमी शुभम मानले जाते. त्यामुळे या चतुर्थीला संकट निवारणाची प्रार्थना भक्तांकडून गणरायाकडे केली जाते. या संकष्ट चतुर्थीला कोरोनाचे संकट निवारण्याची प्रार्थना भक्तांना करावी लागली.मंदिरासमोरील व्यावसायीक अडचणीतगणेश मंदिरासमोर फुल व नारळ विक्रेते बसतात. परंतू मंदिर बंद असल्याने या व्यावसायीकांना आपला व्यवसायही बंद करावा लागला. त्यामुळे फुल व नारळ विक्रेत्यांवर आता आर्थिक संकट कोसळले आहे.चतुर्थीला चांगली उलाढाल होते. परंतू या चतुर्थीला दुकान सुरू करूनही पाहिजे त्या प्रमाणात ग्राहक आले नाही. कोरोनामुळे या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे.- सुनील घटे, फुल विके्रता, बुलडाणा.