डोणगांव : येथून जवळच असलेल्या ग्राम मादणी येथील धारणाजवळ प्रदीप भुजनागराव मेटांगळे यांच्या शेतात १० जंगली बदके मृत अवस्थेत सापडले आहेत. सध्या राज्यभरात बर्ड फ्लूचे संकट असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पशुधन विभाग यांना माहिती मिळताच त्यांनी शेतात येऊन मृत पक्ष्यांचा पंचनामा केले. मृत बदकाचे नमुने पुण्याच्या लॅबमध्ये पाठवण्यात येणार आहेत. तेथून अहवाल आल्यानंतर या बदकांचा मृत्यू कशाने झाला हे स्पष्ट हाेणार आहे.
एकीकडे बर्ड फ्लूने देशात अलर्ट असतानाच दुसरीकडे मादणी येथून जवळच असलेल्या धरणाकाठी प्रदीप मेटांगळे यांच्या शेतात २४ जानेवारीच्या सकाळी १० जंगली बदके काही जिवंत तर काही मृत अवस्थेत आढळले. काही जिवंत असलेल्या बदकांच्या तोंडातून फेस येत होता. याची माहिती गावकऱ्यांकडून पशुधन अधिकारी यांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत बदकांची पाहणी केली. पशुधन अधिकारी घटनास्थळावर पाेहचण्यापूर्वीच कुत्र्यांनी सहा बदके पळविली हाेती. त्यामुळे अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी फक्त चारच बदके मिळून आली. बदकांचा मृत्यू कशाने झाला याचे कारण जाणून घेण्यासाठी पशुधन अधिकारी यांच्यामार्फत बदकांचे नमुने अकोला येथील लॅबच्यामार्फत पुणे येथे पाठवले जाणार आहेत. या बदकांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाला किंवा नाही हे अहवालानंतर स्पष्ट हाेणार आहे. यावेळी पशुधन अधिकारी मेहकर ज्ञानेश्वर देशमुख,एस.आर.गायकवाड, पशुधन पर्यवेक्षक हिवरा आश्रम,बोचरे परिचारक हे हजर होते. शेतकऱ्यांच्या मदतीने मृत बदके जमिनीत गाडण्यात आले.
मृत बदकांचा तपासणी अहवाल पुणे येथील लॅबवरून येत नाही, तोपर्यंत निश्चितपणे सांगता येणार नाही. अहवालानंतर बदकांचा मृत्यू कशाने झाला हे स्पष्ट हाेणार आहे.
-ज्ञानेश्वर देशमुख, पशुधन अधिकारी, मेहकर