हिवरा आश्रम : येथे साडेचार कोटी रुपये खर्च करून वस्तीगृह उभारण्यात आले आहे. मात्र किरकोळ सोयीसुविधांसाठी पुढील काम रखडले होते. दरम्यान, आश्रमाचे विश्वस्त व मूर्तिजापूर येथील उद्योगपती प्रशांत हजारी यांनी दहा लाख रुपयांचा निधी या वस्तीगृहासाठी दिला असून, पैकी तीन लाख रुपये तातडीने उपलब्ध करून दिले आहेत. त्यांच्या या निधीतून फर्निचरचे काम मार्गी लागणार असून, उर्वरित कामासाठी आणखी दानशूर दात्यांनी पुढे यावे, असे आवाहन विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष व भगवद्गीतेचे चिंतनकार रतनलाल मालपाणी यांनी केले आहे. बुलडाणा जिल्ह्यासारख्या मागासलेल्या जिल्ह्यात उच्चशिक्षणच काय परंतु, दहावी-बारावीचे शिक्षणही मुलींच्या नशिबी नव्हते. खेड्यापाड्यातील या मुलींसाठी शुकदास महाराजांनी विवेकानंद आश्रम येथे केजी टू पीजीपर्यंतच्या शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. आई-वडिलांचे असलेले अत्यल्प उत्पन्न पाहाता, या गोरगरिबांच्या मुलींसाठी अगदी अत्यल्पदरात शिक्षण, निवास व भोजनाची सोय महाराजांनी उपलब्ध करून दिली असून, गुणवंत परंतु घरची गरीब परिस्थिती असेल तर संबंधित मुलीचे शिक्षण मोफतही केले जाते. विवेकानंद शैक्षणिक संकुलात मुलींची संख्या वाढल्याने त्यांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाला होता. म्हणून, महाराजांनी सुमारे साडेचार कोटी रुपये खर्च करून नवीन व अद्ययावत मुलींचे वस्तीगृह उभारले आहे. या वस्तीगृहात ९६ खोल्या असून, तेथेच अद्ययावत भोजनगृह देखील आहे. साधारणत: साडेचारशे ते पाचशे मुलींची राहण्याची व भोजनाची सोय या वस्तीगृहात केली जाणार आहे. इमारत बांधून पूर्ण झाली असून, या इमारतीचे उद्घाघाटन शुकदास महाराजांच्याहस्ते करण्याचे स्वप्न मात्र अपुरे राहिले आहे. इमारतीतील विद्युत पुरवठा, फर्निचर व इतर किरकोळ बाबींसाठी साधारणत: ५० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. परंतु, आर्थिक चणचण लक्षात घेता, मूर्तिजापूर येथील उद्योगपती व विवेकानंद आश्रमाचे विश्वस्त प्रशांत हजारी यांनी १० लाख रुपयांचा निधी देण्याची तयारी दर्शविली असून, तीन लाख रुपये तातडीने दिले आहेत. त्यामुळे रखडलेली कामे मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे. आणखी ४० लाख रुपयांच्या निधीची गरज असल्याने समाजातील दानशूर दात्यांनी पुढे यावे, असे आवाहन विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष रतनलाल मालपाणी यांनी केले आहे.
गोरगरिबांच्या मुलींसह सधन शेतकरीवर्गाच्या मुलीही येथे निवासी शिक्षण घेत असून, अत्यल्पदरात त्यांना चांगला निवास व भोजन दिले जाते. गेल्या चार दशकांत येथून शिकून बाहेर पडलेल्या मुली उच्च अधिकारी होऊ शकल्यात. समाजाच्या विविध क्षेत्रात त्या आपले योगदान देत आहेत. आणखी मुलींसाठी निवास व शिक्षणाची सोय व्हावी, म्हणून समाजातील दानशुरांनी पुढे यावे, व मुलींच्या वस्तीगृहासाठी मदत द्यावी.
- संतोष गोरे, सचिव विवेकानंद आश्रम