बुलडाणा/देऊळगाव राजा: बुलडाणा जिल्ह्याची चिंता वाढत असतानाच वाशिम जिल्ह्यातील दहा जण जवळपास सव्वा महिन्यापासून देऊळगाव राजा येथील दोन धार्मिक स्थळामध्ये आश्रयास आले असल्याची माहिती प्राप्त झाली असून प्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान देऊळगाव राजा येथील कोरोना पॉझीटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील १८ जणांना क्वारंटीन करण्यात आले आहे. देऊळगाव राजा शहरातून एकूम २८ जणांना क्वारंटीन करण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यात पाच एप्रिल रोजी चार जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आल्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. त्यातच देऊळगाव राजा येथील हे चिंताजनक वृत्त येऊन धडकले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आता क्लस्टर प्लॅन अॅक्टीव करत आहे. खामगाव मधील चितोडा गाव एकीकडे सील करण्यात येत असतानाच चिखली शहरातील दोन रुग्ण पॉझीटीव्ह आल्याने शहरातील हायरिस्क झोन भाग सील करण्यात आला असून संपूर्ण सहरात सर्वत्र नाकेबंदी करण्यात येत आहे. त्यासंदर्भात उपविभागीय अधिकाºयांनी तसा आदेशही काढला आहे. दुसरीकडे देऊळगाव राजा येथे दोन धार्मिक स्थळांमध्ये प्रत्येकी दहा जण फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात आश्रयास आले असल्याची माहिती देऊळगाव राजा पोलिसांना प्राप्त झाली होती. त्या आधारावर शहरातील धार्मिक स्थळांची पोलिसांनी पाहणी केली असता दोन धार्मिक स्थळामध्ये प्रत्येकी पाच जण आश्रयास आले असल्याचे स्पष्ट झाले. हे सर्व वाशिम जिल्ह्यातील असल्याची माहिती असून त्यांच्या हातावर क्वारंटीनचे शिक्केही मारले असल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे आगामी काळात बुलडाणा जिल्ह्याची चिंता वाढली असून कोरोना संसर्गाचा विळखा बुलडाणा जिल्ह्यात पडत असल्याचे स्पष्ट होत आहे.
वाशिम जिल्ह्यातील दहा जणांनी घेतला देऊळगाव राजा येथील धार्मिक स्थळी आश्रय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 5:53 PM